ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार सुरु

ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार सुरु

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक – ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्याची पाहणी शुक्रवारी (ता.१९) खासदार हेमंत गोडसे यांनी केली. इमिग्रेशनची परवानगी मिळताच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील, अशी माहिती खासदार गोडसे यांनी दिली. नाशिक (ओझर) विमानतळावरून केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत देशांतर्गत विमानसेवा सुरू आहे.

दिल्ली, बेळगाव, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, सुरत या शहरांसाठी सुरू असलेल्या सेवेचा विस्तार सुरू आहे. त्याचबरोबर आता परदेशात जाण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी होती. देशांतर्गत सेवेला प्रतिसाद मिळत असल्याने ओझर येथून आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न होते. आंतरराष्ट्रीय हवाई सेवेच्या प्रस्तावाला दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर विमानतळावर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एचएएलने दोन कोटींचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार पायाभूत सुविधांची उभारणी पूर्ण झाली आहे.

हेही वाचा: नाशिक | ST संपामुळे सिटीलिंक मालामाल; रोजचा गल्ला 10 लाखांपुढे

आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या विभागांच्या सर्व परवानग्याही मिळाल्या आहेत. पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या असून, विविध विभागांच्या परवानगीही प्राप्त झाल्याने आता ओझर विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. गोडसे यांनी येथील ओझर विमानतळावर सुविधांची पाहणी केली.

लवकरच उड्डाण

एचएएल प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या इमिग्रेशन चेक पॉइंट, कस्टम, प्रस्थान सुविधा व स्वतंत्र आगमन आदी सोयीसुविधा आहेत. उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, यात्रेकरू, व्यवसायिकांना परदेशात जाण्यासाठी मुंबई विमानतळावर जाण्याची गरज नसून, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही आपला शेतीमाल विक्रीसाठी सहज परदेशात पाठविणे शक्य होणार आहे. विमानांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ओझर विमानतळ सज्ज झाले असून, इमिग्रेशनची परवानगी मिळताच आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाण सुरू होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी या वेळी दिली.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here