बुलडाण्यातील शेतकरी आंदोलनाला गालबोट; पोलिस व्हॅनवर दगडफेक
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा – राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला आज (ता.19) सायंकाळी 6 वाजेदरम्यान, बुलडाण्यात गालबोट लागले. रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावत असताना, प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने कार्यकर्त्यांनी पेट्रोल अंगावर घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना वेळीच रोखण्यात आले. दरम्यान, काही शेतकर्‍यांनी चिखली ते बुलडाणा रस्ता अडविला असता पोलिसांनी लाठ्याचा वापर केला तर कुणीतरी, पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. परंतु, प्रकृती ठीक नसतानाही मंडपातून रविकांत तुपकर रस्त्यावर येत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राखण्याचे आवाहन केल्यामुळे सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

नागपूरातून बुलडाण्यात आणल्यानंतर रविकांत तुपकर यांनी घरासमोरच आंदोलन सुरू केले आहे. प्रकृती खालावत असतानाही प्रशासन केवळ आंदोलन मागे घेण्याची विनंती करत असून, ठोस असे पाऊले अद्यापही उचचले जात नाही. त्यामुळे गावागावात सरकारविरोधात रोष निर्माण झाला असून, प्रशासन आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मोताळा येथील शेख रफीक या कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यात आले. मात्र शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला. त्यांनी चिखली रोडवर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग वाढू लागल्याने आंदोलनस्थळी असलेल्या पोलिसांनी शेतकरी, कार्यकर्त्यांवर लाठ्या उगारण्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.

या परिस्थितीत कुणीतरी पोलिसांच्या वाहनाला लक्ष करत दगडफेक केल्यामुळे वातावरण अधिकच गंभीर झाले असून, अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. दरम्यान, प्रकृती खालावली असतानाही शेतकर्‍यांना शांततेचे आवाहन रविकांत तुपकर यांनी करत पोलिसांनीही लाठ्याचा व धरपकड करण्याचा प्रयत्न करू नये असे सांगितले. यावेळी दोनशेच्या वर कार्यकर्त्यांनी तुपकरांच्या घरासमोर ठिय्या मांडला आहे, तर तितक्याच प्रमाणात पोलिसांची उपस्थिती आहे. अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी पोलिस सचिन कदम, गुलाबराव वाघ, शिरीष ताथेड, ठाणेदार प्रदीप साळुंखे यांचा समावेश होता. श्री. बनसोडे यांच्याशी रविकांत तुपकर यांनी चर्चा केली. कार्यकर्ते किंवा शेतकर्‍यांनी सदर पोलिस व्हॅन फोडली नाही. बाहेरचे कोणीतरी लोक होते, असा दावा त्यांनी केला. आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्याला नेण्यासाठी आलेली रुग्णवाहिकेवरही दगडफेक झाल्याचे यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here