
5 तासांपूर्वी
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 472 कोटीं चा निधी एमएमआरडीए कडून मंजूर करून आणला होता. हा निधी पालकमंत्री का देत नाहीत? त्यामागे कमिशनचा झोल आहे का? असा सवाल भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत भाजपाच्या जण आक्रोश मोर्चात केला होता. यावर शिवसेनेचे युवा सेना जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी निधी मंजूर करून आणल्याचा पुरावा आमदारांनी दाखवावा, असा सवाल करीत कोणतीही विकास कामे त्यांनी केली नाहीत. विकास कामातील ते शुक्राचार्य असल्याची टीका केली आहे.
शहरातील विकासकामे होत नसल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने गुरुवारी डोंबिवलीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यदरम्यान आमदार चव्हाण यांनी युती सरकारच्या काळात 2019 साली 472 कोटी निधी मंजूर करून आणला होता. हा निधी दिला जात नाही. कमिशनपोटी सगळीच कामे अडवून ठेवली जात असतील तर ते योग्य नाही असे विधान केले होते.
आमदारांच्या या टिकेला शिवसेनेचे युवासेना जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे व डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आमदारांना उलट सवाल केला आहे. आमदार चव्हाण यांच्याकडे 472 कोटी निधी मंजूर करुन आणल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यांच्याकडे पुरावा असल्यास तो त्यांनी सादर करावा असे आव्हान म्हात्रे यांनी भाजपाला केले आहे.
हेही वाचा: BMC : कोविड लक्षणे असल्यास तातडीने चाचण्या करा
शिवसेना ही विकास कामे करते. ती कमीशन खात नसून कमीशन खाण्याची सवय भाजपला असल्याची टिका देखील त्यांनी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोटय़ावधी रुपयांची विकास कामे मंजूर करुन आणली आहेत. तसेच काही कामे प्रत्यक्षात आली आहेत, काही कामे प्रगतीपथावर आहेत.
हेही वाचा: भाजप-सेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा : नावावरून आघाडीत बिघाडी
मात्र भाजप आमदार चव्हाण यांनी निवडणूकीच्या तोंडावर 472 कोटी मंजूर करुन आणल्याचे सांगत कामाचे नारळ फोडले होते. हा निधी कोणत्या खात्यामार्फत मंजूर करुन आणला होता. निधी मंजूर झाला होता तर त्या निधीतून कामे का झाली नाहीत असा सवाल शिवसेनेने भाजपाला केला आहे. यावर भाजपा आमदार रविंद्र चव्हाण हे शिवसेनेला उत्तर देणार असून ते काय प्रतिक्रीया देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Esakal