
परीक्षार्थींना एसटी बंदचा फटका
5 तासांपूर्वी
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत रविवारी (ता.२१) शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (टीईटी) चे आयोजन करण्यात आले आहे. परंतू, मागील पंधरा दिवसांपासून एसटी महामंडळाचा संप सुरु असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षेला जायचे कसे? असा प्रश्न परीक्षार्थ्यांना पडला आहे. पोलिस शिपाई पदासाठी गुरुवारी (ता.१९) लेखी परीक्षा होती. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना पुणे, नगर येथील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, एसटी बससेवा बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता आले नाही.
तसेच आता रविवारी (ता.२१) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. टीईटीचा पहिला पेपर सकाळी दहा वाजता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी किमान एक तास अगोदर केंद्रावर पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातून परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा: मल्टीमॉडेल हबमुळे नाशिक रोडच्या विकासाला मिळणार ऊर्जितावस्था
“२१ तारखेला टीईटीची परीक्षा आहे. सोयगाव तालुक्यात माझे गाव असून मला परीक्षेसाठी शहरातील केंद्र देण्यात आले आहे. तेथून शहरात येण्यासाठी अडीच तास लागतात. बससेवा बंद असल्यामुळे शासनाने खासगी वाहनांना परवानगी दिली आहे. मात्र, त्यांच्याकडून अवाजवी भाडे आकारले जात आहे.” – सौरभ जगताप (परीक्षार्थी)
“पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केल्यानंतर मला पुणे येथील केंद्र देण्यात आले होते. मात्र, खासगी वाहनांकडून दुप्पट भाडे आकारण्यात येत आहे. येण्या-जाण्यासाठी अवाजवीपेक्षा जास्त खर्च होत असल्याने मला परीक्षेला जाता आले नाही.” – रवी जोंधळे (परीक्षार्थी)
Esakal