
5 तासांपूर्वी
पेठ/म्हसगण (जि.नाशिक) : सध्या राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांचा (MSRTC strike) संप सुरू आहे. संपामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर यापूर्वीही राज्यात काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता याच संपामुळे नाशिक जिल्ह्यातील पेठ आगारातील बसचालकाने आत्महत्या केल्याचे समजते.
सुरवातीपासूनच सहकारी कर्मचाऱ्यांसोबत धरणे आंदोलनात सहभाग
गहनीनाथ गायकवाड हे मूळचे मामावली (ता. आष्टी, जि. बीड) येथील रहिवासी… गेल्या पाच वर्षांपासून ते पेठ आगारात चालक म्हणून कार्यरत असल्याने पेठमधील सुलभानगर भागात वास्तव्यास होते. राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) पेठ आगारातील चालक गहनीनाथ अंबादास गायकवाड (वय ३३) यांनी शनिवारी (ता. २०) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांनी सुरवातीपासूनच सहकारी कर्मचाऱ्यांसोबत धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. संपामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर यापूर्वीही राज्यात काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्याचवेळी ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांचेही मोठे हाल झाले. मात्र, ना शासनाने दाद दिली, ना कर्मचाऱ्यांनी माघार घेतली. त्यामुळे, संपाचा तिढा सुटता सुटेना, अशी स्थिती आहे. त्यातच शनिवारी घरी गॅस संपल्याचे गायकवाड यांना समजले. आर्थिक ओढाताणीने विमनस्क स्थितीतच आपल्या खोलीचे दार बंद करून, गळफास घेत आत्महत्या केली. त्या वेळी पत्नी व मुले बाहेरील खोलीत होते.
हेही वाचा: होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही – कोर्ट
बराच वेळ झाला तरी पती दरवाजा का उघडत नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने दरवाजा ठोठावला. पण, आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता गहनीनाथ यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने खासगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात नेले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा: कोरोनाबाधित गर्भवती महिलांना ‘स्टिलबर्थ’चा धोका | US Study
Esakal