
5 तासांपूर्वी
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात ३०८ पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून सदर पक्षी हे वेगवेगळ्या ६४ कुलातील असल्याचे एका अभ्यासातून उघड झाले आहे. आता बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड- कऱ्हाडला अभयारण्यातील पक्ष्यांची नोंद करण्यासाठी सेंट्रल इंडियन बर्ड अकादमीसोबत करार करण्यात आला आहे.
राज्य सरकारने ५ ते १२ नोव्हेंबर या सप्ताहात पक्षी सप्ताह साजरा करण्याचे निश्चित केले. यानिमित्ताने पेंच प्रकल्पात सेंट्रल इंडियन बर्ड अकादमी या संस्थेसोबत पेंच मधील पक्ष्यांचा अढळ व इतर मुद्यांचा अभ्यास करण्याबाबत करार करण्यात आला होता. यात रानपिंगळा या दुर्मिळ पक्ष्याचा अधिवास पेंच व्याघ्र प्रकल्पात शोधणे, मलबार धनेश पक्ष्यांच्या प्रजननाचा अभ्यास, नवेगाव खैरी व तोतलाडोह धरण क्षेत्रातील पक्षी वैविध्याचा अभ्यास आणि क्षेत्रीय कर्मचारी यांचे पक्षी ज्ञान विषयक क्षमता बांधणी करणे या कार्याचा समावेश होता.
हेही वाचा: औरंगाबाद : सय्यद मतीन राष्ट्रवादीतूनही निलंबित
या कार्यक्रमात संपूर्ण प्रकल्प क्षेत्रातील पाणवठे, धरणाचे बुडीत क्षेत्र, गाव व शेजारील भूभाग व वन क्षेत्रात अकादमीचे सदस्य व वन कर्मचारी यांनी पक्षी विषयक माहिती जमा केली. तसेच पक्षी तज्ञ जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ यांची रान पिंगळा व मलबार धनेश बाबत कार्यशाळा झाल्यात. संपूर्ण वर्षभरातील सर्व ऋतू मधील पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या.
यावर्षी पक्षी सप्ताहात पेंच मधील पक्ष्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात ३०८ पक्ष्यांची नोंद झाली. पक्षी हे वेगवेगळ्या ६४ कुलातील आहेत. ही यादी तत्कालीन क्षेत्र संचालक, डॉ. रविकिरण गोवेकर यांना दिली. यावेळी विभागीय वनाधिकारी राहुल गवई यांच्या पुढाकाराने सीआयबीए संस्थेसोबत बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्य क्षेत्रातील पक्षी अभ्यासाबाबत करार केला. पक्षी सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ज्येष्ठ अभ्यासक गोपाळ ठोसर, सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांच्या उपस्थितीत जाहीर केली. यावेळी सेंट्रल इंडियन बर्ड अकादमीचे संचालक डॉ. अनिल पिंपळापुरे, नितीन मराठे, पुष्कर कुलकर्णी, अनिरुद्ध भगत व सृष्टि मेहतकर उपस्थित होते.
Esakal