
5 तासांपूर्वी
विसापूर : संविधान आणि घटनेचा आदर करून, तसेच कायद्याच्या चौकटीत राहून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली. पुसेगाव येथे श्री सेवागिरी मंदिरात बैलगाडी शर्यतीसंदर्भात आयोजित बैठकीत खासदार पाटील बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, विश्वस्त सुरेशशेठ जाधव, प्रताप जाधव, प्रकाश जाधव, विजय जाधव, बाळासाहेब इंगळे, गौतम काकडे, विजय भोसले, राहुल जाधव, बैलगाडी शर्यत असोसिएशनचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
बैलगाडी शर्यतीत बैलांवर होत असलेल्या छळापासून संरक्षणाच्या कायद्याचे सुधारित बिल मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा गोवा राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी, ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे सदस्य कमलेशभाई शहा, ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे सदस्या तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील सिधी विद्या यांनी तयार केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासन परिपत्रक काढून शर्यत सुरू करण्यास परवानगी देऊ शकते. त्यामुळे हे बिल महाराष्ट्र शासनापर्यंत आपल्या माध्यमातून पोचवावे. अशा आशयाची मागणी करणारे निवेदन शर्यत असोसिएशनच्या वतीने खासदार पाटील यांना या बैठकीत देण्यात आले. यांत्रिकीकरणामुळे शेतीसाठी बैलाचा वापर कमी झाला असून, आता फक्त आणि फक्त बैलगाडी शर्यत सुरू झाली तरच हा देशी गोवंश वाचू शकेल, अशी भावना शेतकऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केली.
Esakal