मुंबई

जोगेश्वरी टर्मिनस लवकरच पूर्णत्वास येणार

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

जोगेश्वरी : लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वाढत जाणारा भार कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकात नवीन टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे. या टर्मिनसच्या कामातील दोन फलाटांचे काम पूर्ण झाले असून, अन्य कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या टर्मिनसवरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरपर्यंत हे नवीन टर्मिनस खुले होण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वाढता भार कमी करण्यासाठी टर्मिनसचे नियोजन केले जात आहे. यासाठी पनवेल टर्मिनसच्या कामाला गती दिली जात आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी, दादर, एलटीटी आणि पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून मेल-एक्स्प्रेस सुटतात.

मात्र, पश्चिम रेल्वेवरील लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा भार कमी करण्यासाठी जोगेश्वरीतील टर्मिनसच्या प्रस्तावाला फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे बोर्डाकडून मंजुरीही मिळाली. हे टर्मिनस इतर टर्मिनसपेक्षा छोटे आहे. यासाठी एकूण ७० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. चौकट लोकलसाठीही फलाटाचा वापर पश्चिम रेल्वेवरील काही मेल, एक्स्प्रेस जोगेश्वरी टर्मिनस येथून सुटतील आणि थांबा घेतील; तर मेल, एक्स्प्रेस येण्याचा किंवा सुटण्याचा भार कमी असेल, तेव्हा लोकलसाठीही हे फलाट वापरले जाण्याची योजना आहे. जोगेश्वरी टर्मिनसमध्ये दोन फलाट, तीन रेल्वे मार्गिका तयार होत असून यात दोन फलाटांची कामे पूर्ण झाली आहेत. टर्मिनसवर तीन मार्गिका बनविण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेरीपर्यंत काम पूर्ण करून टर्मिनस सुरू करण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून करण्यात येणार आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here