
स्वच्छतागृहाची मागणी करणे अपराध आहे का? भीमनगरच्या नागरीकांचा सवाल
5 तासांपूर्वी
कोथरुड – विकास आराखढ्यातील रस्त्यासाठी भिमनगर येथील घरे हटवण्यात आली आहेत. मात्र या रस्त्याच्या आड येणारे स्वच्छतागृह पाडण्यास येथील रहीवाशांनी विरोध केला होता. बांधकाम नियमावलीनुसार योग्य ठरेल अशा जागी स्वच्छतागृह उभारुन द्या नंतर जुने स्वच्छतागृह पाडा असे भीमनगर मधील रहीवाशांने म्हणणे आहे. त्यातून उदभवलेल्या संघर्षामुळे वाढलेला दबाव असह्य झाल्याने स्वच्छतागृहाची मागणी करणे अपराध आहे का असा प्रश्न भीमनगर मधील रहीवाशांनी विचारला आहे.
भीमनगर ते मयुर कॉलनी असा २४ मीटर रुंदीचा रस्ता करण्यासाठी येथील काही घरे पाडण्यात आली आहेत. पर्यायी स्वच्छतागृह दिल्यानंतर जुने स्वच्छतागृह पाडा असे येथील रहीवाशांचे म्हणणे आहे. पर्यायी व्यवस्था न करता स्वच्छतागृहाचे दरवाजे तोडून पाडण्याचा प्रयत्न झाला. त्याला येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. नागरिकांना पाठींबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही येथे एक मिटींग घेतली होती. लोकांचा विरोध लक्षात घेवून अधिका-यांनी नाल्यातील जागा स्वच्छतागृह बांधण्यासाठी निवडली. त्या जागेला लोकांनी आक्षेप घेतला. नाल्यात बांधकाम करणे कायद्याला धरुन नाही. पावसाळ्यात तेथे जाणे अडचणीचे होईल. कायदा मोडून बांधणार असाल तर किमान काँक्रिटमध्ये व्यवस्थित उंचीवर बांधा. जेणेकरुन लोकांना स्वच्छतागृहाचा वापर करणे अडचणीचे होणार नाही.
हेही वाचा: सांडपाण्याच्या चेंबर मध्ये पडला, परंतु स्थानिकांमुळे वाचला
कोथरुड पोलिसांनी यासंदर्भात पंचशील मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख यांना नोटीस देवून सरकारी कामात अडथळा का करता याच्या चौकशीसाठी कोथरुड पोलिस ठाण्यात बोलावले होते. शेख यांना अटक करणार अशी माहिती मिळाल्याने भीमनगर मधील शंभरहून अधिक स्री पुरुष छोट्या मुलांसह कोथरुड पोलिस ठाण्यात जमा झाले. हा सर्व वस्तीचा प्रश्न आहे. एकालाच अटक करु नका आम्हा सर्वांनाच तुरुंगात टाका अशी मागणी त्यांनी केली.
जावेद शेख म्हणाले की, स्वच्छतागृहाची दुरुस्ती या नावाखाली टेंडर काढले असून नाल्यामध्ये स्वच्छतागृह बांधत आहेत. बेकायदेशीर काम करु नका. रीतसर टेंडर काढून योग्य जागी स्वच्छतागृह बांधा अशी वस्तीमधील सर्वांची मागणी आहे. परंतु लोकांवर दबाव टाकत ३५३ कलमाखाली तुम्हाला अटक करण्यात येईल अशी धमकी आम्हाला दिली जात आहे.
सोजरबाई खरात या आजी म्हणाल्या की, माझे पती अंध आहेत. त्यांना घेवून मला संडासला न्यावे लागते. आमचे संडास पाडल्यावर आम्ही कुठे जाणार.
हेही वाचा: Corona Update : पुणे शहरात दिवसेंदिवस होतेय कोरोना रुग्णांची वाढ
लीलाबाई डोख म्हणाल्या की, हे कधीपण उठतात आणि संडास तोडायला येतात. बायकांच्या संडासाची दरवाजे पाडले. आमच्या घरात अपंग माणुस आहे. आम्ही म्हातारी कोतारी कुठे जाणार. आम्हाला नवीन संडास बांधून दिल्याशिवाय आम्ही संडास तोडू देणार नाही.
कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे म्हणाले की, रस्त्यामध्ये आलेले शौचालय आम्ही पाडणार आहोत.वस्तीसाठी पर्यायी शौचालय उपलब्ध आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. शौचालय पाडायला विरोध करु नये. येत्या १५ दिवसात हा रस्ता पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.
कोथरुड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप म्हणाले की, शेख यांना समज देण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. लोकांना भडकावू नये अशी समज त्यांना दिली आहे.
Esakal