
२१ नोव्हेंबर २०२१
वेखंडवाडीतनं तारळ्यात चालत यायचं…मग स्टॅन्डला आल्यावर लालपरीच दर्शन व्हायचं. स्टॅन्ड अगदी इकुडच्या तिकुडच्या गावातल्या माणसांनी गजबजल्यालं आसायचं… कॉलेजची पोर पोरी एका बाजूला आन पांढरी काठाला वाईचं मळल्याली पैरण आन खाली तसाच पांढरा लेंगा घातलेली म्हातारी माणसं, नववार नेसलेल्या म्हाताऱ्या बायका कुटंतरी मुटकुळं घालून यसटीची वाट बगत बसल्याली दिसत्यात…कितीबी उशीर झाला तरी यसटी येनारच ह्यो इश्वास आसतो…
बाजारच्या गाडीत मायंदाळी गर्दी आसती…येताना मोकळ्या काळ्या कापडी पिशव्या घिऊन आलेली माणसं जाताना बाजार भरून घिऊन जात्यात तवा उभं राह्यला जागा नसती…
पण जागा न्हाय म्हणून एकदा माणूस माग राह्यलाय आस कवाच झालं न्हाय…गावाकडची साधी, गोरगरीब माणसं ह्या यसटीलाच हक्काची गाडी समजत्यात… इथल्या रूटवरच्या डायव्हर कंडक्टरची नाव सुदा म्हायती असत्यात, आन त्यास्नी सुदा नावासहित कुटला माणूस कूट चढलाय आन कूट उतरणार हाय हे नेमकं म्हायती असत…
डोंगर दऱ्यात, कड्याकपाऱ्यात यसटी पोहचल्या…दूध घालायला येनारी माणसं…शहरात छापून आल्याला पेपर गावाकडं पोहचवण्यापासून अडकलेल्या माणसांना घेऊन रात्रीची मुक्कामाला जाणारी सुद्धा यस्टीच हाय…गावाकडच्या कितीतरी पोरांना मामाच्या गावाला नेणारी आगीन गाडी न्हाय तर यसटीचं हाय आस वाटत…कारण सुट्ट्या लागल्या की ह्याच यस्टीनं कवा मामाच्या गावाला नेलं तर कवा आपल्या घरी माघारी आणलाय…पाचवीपोतर शिकलं की ही यस्टीच आपल्यास्नी हायस्कुलच्या शाळेत नेवून सोडती. दसरा, दिवाळी, असो न्हायतर कुटलाबी सण, यसटीला कवाच सुट्टी नसती…आमच्या गाडीला जाधव नावाचं कंडक्टर हाय ..शाळंतल्या सगळ्या पोरी उतरून घराकडं जाईपर्यंत गाडीची बेल मारत न्हाय..सकाळी एकाद्या माणसाला लेट झालं तरी गाडी पाच मिनटं थांबायची..परीक्षेच्या टायमात कवाच गाडी उशीर करत न्हाय…कवा एकाद्याकडं अडीनडीला चार दोन रुपयं कमी आसल तरी स्वतःच्या खिशातंन घालून तिकीट देताना कितीदा बघितलंय मी…
गावाकडच्या माणसांसाठी कमी पैशात शहरात आपला माल आणायला खत, बियाणं गावात न्यायला यष्टीचाच आधार आसतूया आन म्हणून त्यासनी यसटी देवळापेक्षा कमी न्हाय आन तिजी माणसं देवापेक्षा..! आजारी पडल्यावर …वय झाल्याने डोळ्यात मोतीबिंदू झाल्यावर डॉक्टरांकडं जायला …उतारवयात बँकेतलं पेन्शन काढायला…ह्या यष्टीचाच आधार असतो…हिचा लाल रंग हितल्या माणसांच्या रक्तात भिनलाय आस वाटतं कवा कवा…ही रस्त्यावर नसलं तर विना कुंकवाच्या कपाळागत वाटलं रस्ता…गाव खेड्यात आगदी वाडी वस्तीवर जिथं सरकार सुद्धा पोहचलं न्हाय तिथं यसटी पोहचल्या..कवा तरी, ही आपल्यात नसलं तर आपलं काय हुईल आसा इचार केला तरी अंगावर काटा यतो नुसता…!
यस्टी तोटयात हाय म्हणत्यात…गोरगरीब कवाच तोटा हू न देणारी, आन कायम माणसांनी भरून वाहणारी यस्टी तोटयात कशी हे मला आजपावतर समजलं न्हाय …पण एवढ्या कमी पगारात नोकऱ्या करून गावाकडच्या साध्या माणसाची ने- आण करणारी यसटीची माणसं आन भरमसाठ पगार घिऊन काम करणाऱ्या शहरातल्या गाडीत फरक हाय त्यो सेवेचा …ही यस्टी खर्रच सेवा करती…गावाला देशाशी जोडती…आपली पोटं भरायचं मार्ग मोकळं करणाऱ्या ह्या यस्टीच पॉट कवा रिकामं आसू नयं एवढंच त्या इठ्ठलाकडं मागावस वाटत..!
(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’वरील वेबमालिकेचे लेखक – दिग्दर्शक आहेत.)
Esakal