
5 तासांपूर्वी
नागपूर ः केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात उपराजधानीची घसरण झाली असून पहिल्या २० स्वच्छ शहराच्या यादीतून नागपूर बाहेर फेकले गेले आहे. मागील वर्षी असलेले १८ वे स्थान कायम राखण्यातही अपयशी ठरल्याने केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत महापालिकेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा नागपूरला २३ वे स्थान मिळाले आहे.
केंद्र सरकारतर्फे आज २०२१ मधील स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला. स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरची १८ व्या स्थानावरून २३ व्या स्थानी घसरण झाली. स्वच्छ भारत सर्वेक्षणात गुण देताना विविध निकष आहेत. त्या आधारावर गुण देण्यात येतात. यंदा शहराला सहा हजारपैकी ३ हजार ७२१ गुण मिळाले. मागील वर्षी ४ हजार ३४५ गुण मिळाले होते. सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस या आघाडीवर नागपूरला २ हजार ४०० पैकी १ हजार ८६५, सर्टिफिकेशन या प्रकारात १ हजार ८०० पैकी ५००, सिटिझन फिडबॅक प्रकारात १ हजार ८०० पैकी १ हजार ३५५ गुण मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुण कमी मिळाल्याने महापालिकेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा: इंदौर ठरलं देशातील स्वच्छ शहर; सांगली, लोणावळा सासवडलाही पुरस्कार
या सर्वेक्षणाने महापालिकेच्या स्वच्छ नागपूर नाऱ्याचेही पितळ उघडे पाडले आहे. गेल्या तीन वर्षांत स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरची स्थिती सुधारली होती. त्यामुळे यंदाही नागपूर वरच्या स्थानावर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, शहराची पाच स्थानांनी घसरण झाली. घन कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याने शहराची घसरण झाल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. यंदाही मध्यप्रदेशातील इंदूर शहराने पहिले स्थान पटकावले. पहिल्या २० शहरात राज्यातील नवी मुंबई (चौथे स्थान), पुणे (पाचवे स्थान), ठाणे (१४ वे स्थान), नाशिक (१७ वे स्थान), पिंपरी चिंचवड (१९ वे स्थान) या शहरांचा समावेश आहे.
हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं
“कचरा गोळा करणे, त्याची वाहतूक करणे आणि विल्हेवाट लावणे यासाठीच ४० गुण आहेत. शहरात अजूनही कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रकल्प नाही. जोपर्यंत हा प्रकल्प होत नाही तोपर्यंत नागपूर पहिल्या दहा शहरांत येणे शक्य नाही. याशिवाय अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्याचा निर्णयही चुकीचा ठरला. याआधी त्यांच्या नेतृत्वात शहराचे मानांकन सुधारले होते.”
– कौस्तव चॅटर्जी, पर्यावरणवादी व संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन
Esakal