
5 तासांपूर्वी
मांजरी : गेल्या काही दिवसांतील ढगाळ वातावरण आणि आठवड्यात तीनदा पडलेला अवकाळी पाऊस यामुळे कृष्णाकाठावरील द्राक्षबागावर मोठ्या प्रमाणात डाऊनी व मिलेड्यु रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फुलोऱ्यावरील बागामध्ये फळकुज झाली असल्याने नुकसानीच्या भीतीने द्राक्ष बागायतदारांच्या चिंता वाढल्या आहेत. परिणामी बागांमध्ये औषध फवारणीच्या पंपांचे आवाज घुमत आहेत.
चिक्कोडी, अथणी, रायबाग, कागवाड तालुक्यातील द्राक्षशेतीवर सध्याच्या बदलत्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम होत आहे. सध्या साठ टक्क्यांहून अधिक द्राक्षबागा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहेत. त्यातच तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलका पाऊस पडत असल्याने द्राक्षबागांवर डाऊनी व मिलेड्युचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच फळ कूज व मनी कुजची चिंता वाढली आहे. त्यातून द्राक्षपीक वाचवायचे कसे, याची चिंता द्राक्षबागायतदारांना भेडसावत आहे. पावसाळी परिस्थिती पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱय़ांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा: पुणे : निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई दोन वर्षांनी
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने बागायतदार खूष होते. मात्र छाटणीनंतर हवामान बदलल्याने हंगामावर नुकसानीची टांगती तलवार कायम आहे. परिणामी शेतीऔषधांच्या दुकानांमध्ये गर्दी मात्र वाढू लागली आहे. सध्या पीक वाचविण्यासाठी शेतकऱय़ांची धडपड सुरू आहे.
“हवामानाबाबत अतिशय संवेदनशील असलेल्या द्राक्षशेतीवर होणारा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी विविध औषधांचा वापर करत आहेत. त्यासाठी एकावेळी एकरी तीन-पाच हजाराचा खर्च येत आहे. त्यातही रोग आटोक्यात येत नसल्याने एकीकडे द्राक्षपीक वाचवण्याची चिंता आणि दुसरीकडे वाढता खर्च यामध्ये शेतकऱय़ांची अवस्था बिकट झाली आहे.”
-अण्णासाहेब पाटील, द्राक्षबागायतदार, शिरगुप्पी
Esakal