
कोल्हापूर: जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात तेजी कायम
5 तासांपूर्वी
कोल्हापूर : जागतिक बाजारात कच्या साखरेच्या दरामध्ये तेजीचा कल कायम आहे. बुधवारी जागतिक बाजारपेठेत कच्या साखरेचे दर २०.६८ सेंट प्रति पौंड इतके पोहोचले होते. यामुळे निर्यात करारालाही वेग आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यांसाठीचे साखर निर्यातीचे करार ३२५० ते ३२७० रुपये प्रति क्विंटल एक्स मिल या दराने केले आहेत. भारतातील मोठ्या साखर निर्यातदारांनी ३१०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल दराने त्यांना आवश्यक असलेल्या कच्या साखरेचे डिसेंबरअखेर खरेदीचे करार केले आहेत. आताही निर्यातदार त्यांना आवश्यक असणारे जानेवारी ते मार्च या कालावधीकरिता साखर खरेदी करण्यास इच्छुक आहेत.
१ ते १५ डिसेंबर या कालावधीत बरेच निर्यातदार जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांकरिता साखर खरेदी करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांनी जागतिक बाजारातील दरांचा अभ्यास करून योग्य वेळी साखर विक्री करणे गरजेचे आहे. गुरुवारी (ता. १८) आयएसओ (आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने) २०२१-२२या हंगामात जागतिक बाजारात २५.५ लाख टन साखरेचा तुटवडा भासू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात जानेवारी ते मे या कालावधी करता भारतीय कच्च्या साखरेला मागणी वाढण्याची शक्यता जास्त आहे.
हेही वाचा: बाजीरावांच्या नावाची पाटी बसविण्यासाठी पुणे महापालिकेकडे निधीची कमतरता !
साखर उद्योगातील सूत्रांच्या माहितीनुसार थायलंडमधील साखर हंगाम सुरू होत असल्याने भारतीय कच्च्या साखरेला स्पर्धा होईल. याचा कारखानदारांनी विचार करून साखर निर्यात विक्री करणे गरजेचे आहे. जागतिक बाजारातील मल्टिनॅशनल कंपन्या या भारतीय कारखानदारांबरोबर थेट काम करू इच्छितात आणि त्यांनी तशी सुरुवात केली आहे, त्यामुळे भारतीय कारखानदारांना कच्च्या साखरेचे दर चांगले मिळू लागले आहेत. कारखानदारांनी जागतिक बाजारातील साखरेचा दराचा विचार करून थोडे थोडे साखरेचे करार करीत जावेत जेणेकरून वाढीव दराचा फायदा मिळू शकेल, असे निर्यातदार सूत्रांनी सांगितले. सध्या जागतिक बाजारात पांढरी साखर (व्हाइट शुगरला) मागणी फार कमी आहे. भारताची हक्काची बाजार पेठ असलेल्या अफगाणिस्तान व श्रीलंका या देशातील अंतर्गत अडचणीमुळे मागणी कमी आहे. याचा फटका पांढऱ्या साखर निर्यातीला बसत आहे.
देशांतर्गत बाजारात साखर दर घसरले
पांढऱ्या साखरेचे सौदे ३२०० ते ३२७० प्रति क्विंटल या दराने निर्यातीसाठी झाले होते. परंतु देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात घसरण झाली आहे. ऑगस्टपासून देशांतर्गत बाजारात असलेली तेजी कमी झाली आहे. संपलेले सणासुदीचे दिवस आणि यंदाच्या हंगामात तयार होणारी नवीन साखर या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात साखरेला काहीशी मागणी कमी असल्याने याचा फटका दर घसरणीलाही बसला आहे. सध्या ३१५० ते ३२५० या दरात साखर विक्री होत आहे. साधारणपणे नोव्हेंबरच्या प्रारंभापासून दरात घसरणीला प्रारंभ झाला.
आता यंदाच्या हंगामातील साखरनिर्मिती सुरू झाल्याने देशांतर्गत बाजारात साखर दर कधी वाढतील, या बाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील निर्यातदार पांढरी साखर कमी दराने मागणी करत आहेत. भविष्यात जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. कारखानदारांनी भविष्यात साखरेचे दर वाढतील याची वाट न पाहता थोडी थोडी साखर योग्य दरात विकत जाणे हे फायद्याचे ठरेल, त्यामुळे त्यांना सरासरी भाव चांगला मिळेल. असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.
गोळ्या
जागतिक बाजारात कच्च्या साखरेला मागणी वाढण्याची शक्यता
जानेवारी ते मे या कालावधीत भारतीय साखरेला संधी
पांढऱ्या साखरेच्या मागणीत घट
देशांतर्गत बाजारात साखर दर कमी
अफगाणिस्तान श्रीलंकेतून मागणी कमी
जागतिक बाजारात हंगाम २०२१-२२ मध्ये २५.५ लाख टन साखरेचा तुटवडा शक्य
—
प्रतिक्रिया
जागतिक बाजारात साखरेच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. त्यामुळे भारतीय कारखानदारांनी जागतिक बाजारातील दराचा अभ्यास करून योग्य वेळी साखर निर्यातीकरिता थोडी थोडी साखर विकत राहणे फायद्याचे होईल. जानेवारी ते मे २२ या कालावधीत जागतिक बाजारात भारतीय कच्या साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी राहील, अशी शक्यता आहे.
-अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार
Esakal