पिंपरी

एसटीचे दररोजचे सात लाखाचे नुकसान

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर एसटी आगार प्रशासनाचे दररोजचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांत एक कोटींहून अधिक नुकसान आगाराचे झाले आहे. परिणामी, आगारातील एसटी जागेवरच ठप्प राहिल्याने वाहनांच्या बॅटऱ्या डाउन झाल्याचे चित्र समोर आले आहे.
वल्लभनगर आगारातील ११ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तरीही कर्मचारी मागे हटलेले नाहीत. त्यात कार्तिकी एकादशी पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या देखील ठप्प राहिल्या. अधिक प्रमाणात नुकसान झाले.

दिवाळीहून परतीच्या प्रवासावेळीच एसटीचा संप झाल्याने अनेकजण गावीच अडकून राहिले. शिवाय दिवाळी व पर्यटनातून मिळणारा नफ्यालाही मार बसला. कोकण दर्शन आणि महाबळेश्वर या ठिकाणी सुरू झालेल्या गाड्यांमुळे आगाराला चांगले उत्पन्न मिळू लागले होते. परंतु, दोन फेऱ्यानंतर लालपरीची चाके जाग्यावरच थांबली. त्यानंतर आठ तारखेला संपच सुरू झाला. तो अद्यापपर्यंत सुरू आहे. मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा लढा सुरुच राहणार असल्याने एसटी आणखी तोट्यात जाणार असल्याची चिन्हे आहेत.

दिवसभर आगारात ६५ च्यावर एसटी जागेवरच उभ्या असल्याने या सर्व वाहनांचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढणार आहे. बऱ्याच वाहनांच्या बॅटरी डाउन झाल्या आहेत. ब्रेक सिस्टीम, इंजिन व ऑईलची तपासणी करावी लागणार आहे. प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी असे मिळून या एसटी देखभाल दुरुस्तीचे कामकाज पाहत आहेत. परंतु, सर्व वाहनांची कर्मचाऱ्यांअभावी देखभाल करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे, एसटी प्रशासनाची डोकेदुखी संप मिटल्यानंतर आणखी वाढणार आहे.

‘‘दररोज आगारात एसटी जागेवरच ठप्प आहेत. देखभाल दुरुस्तीचा काही अंशी त्रास होणार आहे. मात्र, आगाराचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान होत आहे.’’

गोविंद जाधव,

स्थानक प्रमुख, वल्लभनगर आगारEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here