st संप

एसटी संपाचा टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बसला फटका

sakal_logo

द्वारे

मीनाक्षी गुरव

पुणे – राज्यातील लाखो उमेदवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या प्रवासाच्या समस्येचा डोंगर पार करत शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी दिली. या संपामुळे हजारो उमेदवारांनी आदल्यादिवशीच परीक्षेच्या ठिकाणी मुक्काम ठोकला. या संपामुळे खिशाला बसलेली आर्थिक झळ सोसत अनेकांनी ही परीक्षा दिली.

राज्यातील एक हजार ४४३ केंद्रांवर रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा झाली. या परीक्षेसाठी चार लाख ६८ हजार ९४८ उमेदवारांनी अर्ज केला होता. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही उमेदवारांना घरापासून लांब असणाऱ्या परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. विविध कारणांमुळे टीईटी परीक्षा सातत्याने पुढे ढकलली जात होती. अखेर २१ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आणि रविवारी ही परीक्षा पार पडली. एका परीक्षा केंद्रात किमान १५० तर कमाल एक हजार २०० उमेदवारांच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी हजेरी लावली.

खासगी वाहनांना दुप्पट, तिप्पट प्रवास भाडे देऊन उमेदवारांनी परीक्षेचे ठिकाण गाठले आणि टीईटीची परीक्षा दिली. तर काही विद्यार्थ्यांना मात्र एसटी संपामुळे गावाहून परीक्षा केंद्रावर पोचणे अशक्य झाल्याचेही दिसून आले.

हेही वाचा: महाविकास आघाडी सरकारने प्रेतयात्रा काढून शेतकरी धोरणाचा निषेध

‘सकाळ’च्या व्हॉटस्‌ॲप क्रमांकावर टीईटी परीक्षार्थींनी मांडल्या व्यथा

टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एसटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे परीक्षेच्या ठिकाणी पोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी मांडणारे वृत्त ‘सकाळ’ने ‘टीईटी परीक्षार्थींना एसटी संपाची झळ’ या शीर्षकाखाली रविवारी प्रसिद्ध केले. या वृत्तात परीक्षार्थी उमेदवारांना आलेले अनुभव, समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला, त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे :

‘एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या रास्त असून त्यासाठी पुकारलेला संप आहे. पण या संपाचा फटका टीईटी परीक्षा देणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना बसला आहे. परंतु सगळे विद्यार्थी आणि नागरिक एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे आहेत.’

– मनोहर घाटे (नांदेड), टीईटी परीक्षार्थी उमेदवार

‘एसटी संपाचा विचार करता टीईटी परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक होते. अनेक विद्यार्थ्यांना एसटी संपामुळे समस्यांना तोंड द्यावे लागले.’

– महादेव खाडे (कोल्हापूर)

‘टीईटी परीक्षेसाठी मला लातूर येथील परीक्षा केंद्र आले आहे. परंतु गावाहून परीक्षा केंद्रावर जायला एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे मी परीक्षा देऊ शकलो नाही. खासगी प्रवासी वाहनांनी जवळपास पाच हजार रुपये प्रवास भाडे सांगितले. मी बेरोजगार असल्यामुळे एवढे पैसे देणे अशक्य होते.’

– महेश महाजन (लातूर), टीईटी परीक्षार्थी उमेदवार



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here