
5 तासांपूर्वी
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सातारा सोसायटी मतदारसंघासाठी आज सातारा येथे शांततेत मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेत ४१६ पैकी ३९७ मतदारांनी सहभाग नोंदवला. या मतदानाची टक्केवारी ९५.४३ टक्के इतकी असून या मतांची मोजणी मंगळवारी (ता. २३) साताऱ्यात होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. पक्षविरहित बँकेची वाटचाल यापुढेही कायम तशीच राहावी, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चा, परस्पर सामंजस्याने निवडणूक टाळण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांमुळे निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. पहिल्याच टप्प्यात आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह ११ संचालक बिनविरोध निवडून आले.
यामुळे उर्वरित जागांचा तिढादेखील वाटाघाटी आणि चर्चेअंती मोकळा होईल, असा अनेकांचा कयास होता. मात्र, तो फोल ठरला. ११ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित दहा जागांसाठी लागलेल्या निवडणुकीसाठी आज सातारा येथे मतदान झाले. या मतदान प्रक्रियेदरम्यान प्रत्येक मतदाराला ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला एक, तर महिला गटातील दोन उमेदवारांना प्रत्येकी एक याप्रमाणे दोन मते द्यायची होती. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर त्याठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दाखल झाले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उर्वरित मतदान पूर्ण करून घेण्यासाठी केंद्राबाहेर तळ ठोकला होता. या मतदान केंद्रावर दिवसभरात ३९७ मतदारांनी मतदान केले. या मतदान प्रक्रियेत १९ मतदारांनी मतदानाला दांडी मारली.
Esakal