
टीम इंडियाकडून ब्लॅक कॅप्स व्हाइट वॉश!
5 तासांपूर्वी
India vs New Zealand, 3rd T20I : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातील विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाइट वॉश केलं. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिलच्या 51 धावा वगळता न्यूझीलंडच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. न्यूझीलंडचा डाव 17.2 षटकात 111 धावांवर आटोपला. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
हेही वाचा: Video : पंत सोडत नसतो; मार्क.. पुढे गेला तो गेलाच!
रोहित शर्माच्या अर्धशतकासह तळाच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 184 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गप्टिल आणि डॅरेल मिशेल जोडीने न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकात मिशेल बाद झाला. याच षटकात अक्षर पटेलनं मार्कलाही माघारी धाडले. ठराविक अंतराने विकेट पडत असताना गप्टिलने 36 चेंडूत 51 धावांची खेळी केली. टिम सेफर्टच्या 17 धावा आणि लॉकी फर्ग्युसनेच्या 14 धावा वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
हेही वाचा: IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर
ठेवलं तगडे आव्हान
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी सुमार झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धचा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचा दणका दिला होता. या पराभवामुळे भारतीय संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. घरच्या मैदानात न्यूझीलंडला पराभूत करत टीम इंडिया पुन्हा ट्रॅकवर आलीये. वर्ल्ड कपनंतर टी-20 संघाची जबाबदारी रोहित शर्मावर आलीये. त्याच्यासोबत शास्त्रींच्या जागेवर राहुल द्रविड मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने हॅटट्रिकसह सामना जिंकत आगामी टी-20 वर्ल्ड कपची जोरदार तयारी सुरु केलीय. आगामी वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार आहे. या मालिकेने टीम इंडियाने नव्या प्रवासाला सुरुवात केलीये. जयपूरच्या मैदानासह रांचीच्या मैदानात टीम इंडियाने धावांचा पाठलाग करताना विजय नोंदवला होता. तिसऱ्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करुनही जिंकता येते, हेच टीम इंडियाने दाखवून दिले.
Esakal