
Video : पंत सोडत नसतो; पुढे गेला तो गेलाच
२१ नोव्हेंबर २०२१
भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरा T20I : टीम इंडियाने दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात अक्षर पटेलनं डॅरेल मिशेलला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या मार्क चॅपमॅनला अक्षरने खातेही उघडू दिले नाही. अवघे दोन चेंडू खेळून तो बाद झाला. सलामीवीर बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी असताना मार्क चॅपमॅन चुकीचा फटका खेळला. पुढे गेलेल्या मार्कला पंतने मागेही फिरुच दिले नाही. अक्षर पटेलने आपल्या पहिल्या 2 षटकात 2 धावा देऊन तीन विकेट घेतल्या. मार्टिन गप्टिल एकाकी खिंड लढवत होता.
तिसरा आणि अखेरचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगला आहे. या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपला निर्णय सार्थ ठरवत रोहितने दमदार अर्धशतक केले. इशानच्या साथीने त्याने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अखेरच्या षटकात भारताच्या तळाच्या फलंदाजांनी किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हर्षल पटेल आणि दीपक चाहरने केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 184 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवातच खराब झाली. मार्टीन गप्टिलच्या 36 चेंडूत 51 धावांच्या खेळीशिवाय अन्य कोणालाही मैदानात तग धरता आला नाही.
भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यातील विजयासह मालिका आधीच खिशात घातली आहे. तिसरा आणि अखेरचा सामन्यातही भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. रोहित-द्रविड पर्वाची दमदार झलकच या मालिकेत पाहायला मिळाली आहे.
Esakal