अमृता पवार

ग्लॅम-फूड : ‘लॉकडाउनच्या काळात स्वयंपाकाची गोडी लागली’

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

– अमृता पवार

इटालियन डेझर्ट्‌सची प्रचंड क्रेझ आहे मला. तिरामिसू आणि पॅना कोटा हे त्यापैकी प्रचंड आवडणारे पदार्थ आहेत. मुंबईत ठराविक रेस्टॉरंट्समध्येच मी हे पदार्थ खाते, प्रचंड आवडीने. ‘फूडी’ असल्याने मला वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतं आणि अशाच शोधात मी हे दोन पदार्थ ट्राय केले आणि त्यांच्या प्रेमात पडले. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी डेअरी प्रॉडक्ट खाऊ शकत नाहीये आणि गेले तीन ते चार महिने मी या पदार्थांना हातदेखील लावलेला नाहीये; पण ज्यांना कोणाला गोड आवडतं त्यांना मी ‘तिरामिसू’ आणि ‘पॅना कोटा’ आवर्जून खायला सांगीन आणि जशी मला परवानगी मिळेल तशी मी यांच्यावर तुटून पडणार आहे.

मी खवय्येगिरीवर प्रेम करणारी असले, तरी कुकिंगमधला ‘सी’सुद्धा मला यायचा नाही; पण लॉकडाऊनने लोकांना जसे सगळ्यांना खूप काही शिकवले, तसेच मलाही स्वयंपाक करायला शिकवले आणि ते प्रेमाने इतरांना खाऊ घालायलाही शिकवले. आपण बनवलेले समोरची व्यक्ती खूप आवडीने खाते हे बघून स्वयंपाकाची आवड आणखी वाढत गेली. आता तर, कामातून वेळ काढून मी स्वयंपाक करते. अनेक पदार्थ करून मी सेटवरही नेते. ते पदार्थ सगळ्यांना आवडीने खाताना बघते आणि कामाचा शीण गायब होतो.

लॉकडाउनमध्ये मी एकदा रसगुल्ले बनवले होते. रसगुल्ले तर खूप छान झाले; पण त्याचा पाक फसला. त्याचा पाक हा खूप पातळ असतो; पण माझ्याकडून थोडा घट्ट झाला आणि अजाणतेपणी त्यात रसगुल्ले टाकून फ्रीजमध्ये ठेवून दिला. जेवणानंतर सगळ्यांना एक्साइटमेंटमध्ये वाढायला गेले, तर त्यांचा अगदी दगड झाला होता.

आईच्या हातचे रव्याचे लाडू मला प्रचंड आवडतात. तिने केलेले लाडू तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात. गोड आवडत असल्यामुळे मी आवडीने सगळ्यांच्याकडे रव्याचे लाडू खाते; पण आईसारखे लाडू कोणाकडेच मिळाले नाहीत. माझ्या हातचे श्रीखंड भरपूर जणांना आवडते. ती माझी स्पेशालिटी आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here