
5 तासांपूर्वी
मुंबई : ‘संयुक्त राष्ट्रांचे सागरी सुव्यवस्थेचे तत्त्व झुगारून काही बेजबाबदार देश वर्चस्ववादी वृत्तीतून आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचे चुकीचे अर्थ लावत आहेत; तरीही भारत सर्व देशांचे हित जपणाऱ्या नियम-आधारित हिंद-प्रशांत क्षेत्राची संकल्पना मांडतो,’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज नाव न घेता चीनवर टीका केली. स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही विनाशिका राजनाथसिंह यांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.
राजनाथसिंह म्हणाले, ‘‘भारत हा मुक्त, नियम-आधारित सागरी व्यवस्थेचा समर्थक आहे. मात्र काही बेजबाबदार देश आपल्या संकुचित पक्षपाती हितसंबंधी वृत्तीतून आंतरराष्ट्रीय कायद्यांचा चुकीचा अर्थ लावत आहेत. हे देश नियमाधारित सागरी व्यवस्थेतील अडथळे ठरत आहेत.’’ ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही विनाशिका भारताची सागरी सुरक्षा बळकट करेल आणि राष्ट्रहिताचे संरक्षण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंद-प्रशांत क्षेत्र खुले, निर्धोक आणि सुरक्षित ठेवणे हे भारतीय नौदलाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने हा प्रदेश महत्त्वाचा आहे. सागरी चाचेगिरी, दहशतवाद, शस्त्रास्त्रे आणि अमलीपदार्थांची तस्करी, मानवी तस्करी, बेकायदा मासेमारी आणि पर्यावरणाची हानी यांसारखी आव्हाने येथे आहेत. त्यामुळे संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रात भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते, असे राजनाथसिंह म्हणाले. यावेळी नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीरसिंह उपस्थित होते.
हेही वाचा: हा पुरस्कार माझा नसून काळ्या आईचा – पद्मश्री राहीबाई
सरकारने उचललेली पावले आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांना चालना देत राहतील. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राने सरकारच्या धोरणांचा लाभ घेऊन, एकत्रितपणे काम करून भारताला स्वदेशी जहाजबांधणीचे केंद्र बनवावे.
– राजनाथसिंह, संरक्षणमंत्री
-
१६३ मीटर लांब, १७ मीटर रुंद आणि साडेसात हजार टन वजनी युद्धनौकेवर घातक क्षेपणास्त्रे, रडार व सेन्सर
-
शत्रूच्या विमानांवर आणि पाणबुड्यांवर हल्ला करण्याची क्षमता
-
ताशी ३० सागरी मैल (५४ किमी) वेगाने प्रवास
-
जमिनीवर व हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम, लघु पल्ल्याच्या तोफा, पाणबुडीविरोधी रॉकेट
-
विनाशिकेवर स्वदेशी बनावटीची रॉकेट लॉन्चर्स, टॉर्पेडो लॉन्चर्स आणि एएसडब्लू हेलिकॉप्टर
-
आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांना तोंड देण्याची क्षमता
Esakal