औरंगाबाद : कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीत १८१८ कोटी माफ
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कृषीपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी शासनाने महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील १८१८ कोटी ४२ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल १३२१ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार ८४४ शेतकऱ्यांकडे ४ हजार ४६२ कोटी ३० लाख रुपयांची मूळ थकबाकी होती.

त्यातील १८१८ कोटी ४२ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे १ कोटी २१ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे २६४२.६७ कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १३२१ कोटी ३३ लाख रुपये व चालू वीजबिलांची भरणा केल्यास उर्वरित १३२१ कोटी ३३ लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: औरंगाबाद : पंढरपूर येथे अवैध गॅस रिफलिंग सेंटरवर छापा

आतापर्यंत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ५३ हजार ९०१ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकी मुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी १८ कोटी ५८ लाखांचे चालू वीजबिल व ११ कोटी ३६ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकी मुक्ती योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

२८५४ शेतकऱ्यांचे वीजबिल कोरे

औरंगाबाद परिमंडलातील २८५४ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ६ कोटी २४ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी १ कोटी १५ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे ३ कोटी १२ लाखांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे ३ कोटी १२ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here