
5 तासांपूर्वी
मुंबई : मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी राज्यातील इंटलिजन्स अपयशी ठरलं होतं. त्यामुळे अमरावतीमध्ये मोर्चा कसा निघाला (Amravati Violence) हे माहिती नाही, असं सांगितलं होतं. ते का अपयशी ठरलं? याबाबत संजय राऊतांना (Sanjay Raut) विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे. तसेच आज भाजपकडून सुरू असलेल्या धरणे आंदोलनावरून देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. भाजप कशासाठी आंदोलन करतंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व, राणेंच्या पॅनेलचा सुपडासाफ
भाजपला परत दंगल करायची आहे का? भाजप आंदोलन कशासाठी करत आहे. देशातील महागाई की चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली त्याबाबत भाजप आंदोलन करत आहे? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटविली. त्यामागे कोण होतं हे राज्याच्या गृहमंत्र्यांना माहिती आहे आणि ते अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. अमरावती शांत झाली असताना कोणीही येऊन उगाचच काड्या करण्याचं काम करू नये, असंही ते म्हणाले.
अमरावतीमध्ये फक्त एका गटावर गुन्हे दाखल करण्यात आले, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यालाच संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. ”भाजपच्या काही लोकांवर गुन्हे दाखल होणं म्हणजे हिंदूवर गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करणं चुकीचं आहे. अमरावतीतील जे दंगलखोर आहेत. ज्यांनी जनतेचं नुकसान केलं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कायदेशीर कारवाई करताना गट-तट पाहिले जात नाही. महाराष्ट्रात अशा घटना घडू नये यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी तेल न टाकता ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अमरावतीसारख्या घटनांचे राजकारण-पेटवापेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
राज्यातील इंटलिजन्स का अपयशी ठरलं?
राज्यातील इंटलिजन्स का अपयशी ठरलं? असं राऊतांना विचारलं असता, ते म्हणाले ”काश्मीर-त्रिपुरामध्ये इंटलिजन्स अपयशी ठरतं. तिकडे सिंघू आणि गाजियाबाद बॉर्डरवर इंटलिजन्स अपयशी ठरतं. कारण ते देखील माणसंच आहेत. त्यांच्याकडून चुका होऊ शकतात,”
Esakal