
शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या, नवरदेवाचे टोकाचे पाऊल
5 तासांपूर्वी
माजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील नित्रुड येथील पांडुरंग डाके याचा विवाह माजलगाव येथील मुलीशी झाला होता. शनिवारी येथील मंगल कार्यालयामध्ये रेशीम गाठी बांधल्या गेल्या. आज सोमवारी (ता.२२) या लग्नानिमित्त सत्यनारायण महापूजा करण्यात आली. परंतु पुजा संपताच नवरदेवाने शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नित्रुड येथे घडली आहे. तालुक्यातील (Majalgaon) नित्रुड येथे पांडुरंग रामकिसन डाके (वय २६) हा युवक शेती व किराणा दुकानाचा व्यवसाय करतो. शनिवारी (ता.२०) माजलगाव येथील मंगल कार्यालयात (Beed) थाटामाटात लग्न झाले. यानंतर आज सोमवारी वधू-वरांकरीता सत्यनारायण महापूजाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त नातेवाईकांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले. (Crime In Beed)
हेही वाचा: Youth Congress प्रदेशाध्यक्षपदासाठी दिग्गजांचे सुपुत्र मैदानात
सत्यनारायण पूजा आटोपल्यानंतर नवरदेवाने जेवण केले आणि पाय दुखत असल्याचे सांगत शेतात जाऊन येतो म्हणत त्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील शेतकऱ्याने सदरील घटना डाके कुटूंबीयांना सांगितली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करीता ग्रामीण रूग्णालयात पाठविला असुन आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही. दरम्यान हळद अंगावरील फिटण्याआधीच नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Esakal