
5 तासांपूर्वी
देवरी (जि. गोंदिया): तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या तोयाटोला येथील सुरेंद्र कैलास वल्के (वय ३६) हा दोन मुली व मुलासह गुजरातमधील सुरत येथे कामाच्या शोधात गेला होता. तिथे सुरेंद्र वल्के आणि दोन मुली ग्रेसी वल्के (वय १३), रुक्ष वल्के (वय ६) आणि मुलगा मोक्ष वल्के (वय ३) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सर्व मृतदेह तलावात फेकण्यात आले. तसेच सुरेंद्रचा मृतदेह पाच किलोमीटरवरील शेतशिवारात सापडला, अशी माहिती मृत सुरेंद्र वल्के यांचा धाकटा भाऊ मनोज वल्के यांनी दिली. ही घटना १६ नोव्हेंबरला घडल्याची माहिती आहे.
सुरेंद्र वल्के हा गुजरात येथील सुरत येथे मजुरीसाठी गेला होता. सोबत दोन मुली आणि मुलगा होता. पैशाची अडचण आहे म्हणून सुरेंद्रने काकाला घटनेच्या एक दिवसाआधी फोनवर कळविले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सुरतच्या कंबरेज पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतशिवारात सापडल्याचा संदेश मिळाला.
हेही वाचा: सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट
बातमी मिळताच मनोज भावाच्या शोधात १६ नोव्हेंबरलाच गुजरातला रवाना झाला. १७ नोव्हेंबरला पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी सुरेंद्रचे शवविच्छेदन झाल्याचे कळले. काही तासांत तीन मुलांचे मृतदेह तलावात सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आणि ओळख पटविण्यासाठी बोलावण्यात आले. त्यामध्ये तिन्ही मृतदेह मनोजच्या पुतण्याची असल्याचे सिद्ध झाले. तिघांचेही शवविच्छेदन १८ नोव्हेंबरला झाले असून त्याचा रिपोर्ट अजूनही मिळालेला नसल्याचे सांगण्यात आले.
भावाच्या आणि पुतण्याच्या मारेकरी अज्ञात हल्लेखोरांना पकडून फाशीची शिक्षा द्यावी, कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मनोज वल्के यांनी केली आहे. सदर घटनेमुळे देवरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?
या घटनेची फिर्याद मनोज यांनी माजी आमदार संजय पुराम यांच्याकडे मांडली असता पुराम यांनी पदाधिकाऱ्यांसह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना देवरीचे तहसीलदार आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत निवेदन पाठवून या हत्याकांडाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. निवेदन देताना भाजपचे राजेश चांदेवार, आनंद नळपते, देवकी मरई, नूतन कोवे, सरिता नेताम, कांता कुंभरे, विजय मडावी आदी उपस्थित होते.
Esakal