
२२ नोव्हेंबर २०२१
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोनाने निफाड तालुक्यातही कहर केला होता. प्रत्येक जण हादरून गेला. मात्र, लॉकाडउन, कोरोनाच्या नियमांची कडक अमंलबजावणी व बंपर लसीकरण झाल्याने निफाड तालुक्यात सहा महिन्यांत कोरोना नियंत्रणात होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या पाहता जीवघेणा आजार पुन्हा डोके वर काढू लागल्याचे चित्र आहे. तीन आठवड्यांत तालुक्यात तब्बल ५२ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज असून, दुसऱ्या लाटेचा भाग दोन दिसण्याची भीती आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात तुडुंब गर्दी झाली. विनामास्क नागरिक वावरत होते. सुरक्षितता न पाळल्याने कोरोनाने पुन्हा हात-पाय पसरायला सुरवात केलेली दिसते. निफाड तालुक्यात दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू होता. नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण निफाड तालुक्यात सापडला. नंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. कोरोनाचा भस्मासुर दुसऱ्या लाटेत अधिकच रौद्र रूप घेऊन आला. नाही नाही म्हणता निफाड तालुक्यात २० हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. त्यात ७८० नागरिकांचा मृत्यू झाला. तालुक्यातील अनेक रुग्णालये कोरोना केंद्रांत रूपांतरीत झाल्याचे विदारक चित्र आपण पाहिले. अशा जीवघेण्या संकटातून मेअखेर काहीसा दिलासा मिळाला आणि रुग्णसंख्या घटली. जनजीवन पूर्वपदावर आले.
लॉकडाउन दूर होताच नागरिक बेफिकीर झाल्याचे दिसत होते. लसवंत नागरिक तर कोरोनावर विजय मिळविल्यासारखे वावरत होते. त्याचा परिणाम आता दिवाळी झाल्यानंतर कोरोना पुन्हा फणा काढण्याच्या तयारीत आहे. १ ते २१ नोव्हेंबरपर्यत बाधितांची आकडेवारी चिंतेत टाकणारी आहे. या तीन आठवड्यांत निफाड तालुक्यात तब्बल ५२ लोकांना कोरोनाने घेरले, तर एकाचा मृत्यू झाला. ओझर, लासलगाव, चांदोरी, देवगाव येथे रुग्ण आढळून येत आहेत. सक्रिय रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी ‘पुढच्यास ढेच मागचा शहाणा…’ यानुसार बोध घेत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
हेही वाचा: नाशिक : ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध
लस घेतली असेल, तरी कोरोनाचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अतंर ठेवायलाच हवे. सर्दी, ताप, खोकल्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी.
-डॉ. चेतन काळे, कोविड नोडल अधिकारी, निफाड
हेही वाचा: MPSC: PSI पदासाठी नाशिक केंद्रावरील नियोजित मुलाखती ढकलल्या पुढे
Esakal