
5 तासांपूर्वी
कोल्हापूर : शासकीय कर्मचारी सभासद असलेल्या येथील राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी ३४ अर्ज तर आजअखेर १२६ अर्ज दाखल झाले. उद्या (ता. २३) दाखल अर्जांची छाननी होणार आहे.
हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा – HC
बँकेसाठी १९ डिसेंबरला निवडणूक होत आहे. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत. संचालक पदाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होत असून सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी तगडे पॅनेल देण्याचा प्रयत्न केला आहे.
दोन्ही पॅनेलची घोषणा झाली असून सत्तारूढ गटाने आठ विद्यमान संचालकांना वगळले आहे, या वगळलेल्या संचालकांनी एकत्र येऊन दुसरे पॅनेल तयार केले आहे. या निवडणुकीसाठी १५ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. आजअखेर सर्वसाधारण गटातील १० जागांसाठी सर्वाधिक ८१ अर्ज दाखल झाले. महिला प्रतिनधी गटातील दोन जागांसाठी १४, अनुसुचित गटाच्या एका जागेसाठी १२ तर भटक्या व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातील प्रत्येकी एका जागेसाठी अनुक्रमे ११ व ८ अर्ज दाखल झाले आहेत.
हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा
उद्या (ता. २३) सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी भूविकास बँकेतील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होणार आहे. सत्ताधारी गटात पहिल्यांदाच फूट पडल्याने निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. २४ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून ८ डिसेंबर दुपारनंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Esakal