रेल्वेने बदलला रामायण एक्सप्रेसच्या वेटर, कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड

साधूंच्या कपड्यांसारखे कपडे घातलेल्या वेटर आणि कर्मचाऱ्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावर साधूमंहंतांनी आक्षेप घेतला होता.

sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

पर्यटन वाढवण्याच्या हेतूने देशात रामायण एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. सध्या या एक्सप्रेसची चर्चा त्यातल्या वेटर आणि कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडमुळे होत आहे. साधूंच्या कपड्यांसारखे कपडे घातलेल्या वेटर आणि कर्मचाऱ्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावर साधूमंहंतांनी आक्षेप घेतला होता. तसंच हा ड्रेसकोड बदलण्याची मागणी केली होती. याबाबतचे पत्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवण्यात आलं होतं. यानंतर रेल्वेने सर्कीट स्पेशल ट्रेनमध्ये सर्व्हिस देणाऱ्या वेटर्सचा ड्रेस कोड बदलला आहे.

अयोध्या रामेश्वरम ट्रेनमध्ये भगवी वस्त्रे परिधान केलेल्या वेटरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर उज्जैनमधील साधूंनी हा संतमहंतांचा अपमान असल्याचं म्हणत आक्षेप घेतला. याप्रकरणी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून ड्रेस कोड बदलण्याची मागणी करण्यात आली होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वेटर्स साधु महंतांच्या भगव्या कपड्यांमध्ये, धोती, पगडी आणि रुद्राक्ष माळा घालून भांडी उचलताना दिसत होते.

उज्जैन आखाडा परिषदेचे अवधेश पुरी महाराज यांनी हा ड्रेसकोड म्हणजे संतांचा अपमान असल्याचं म्हटलं. तसंच लवकरात लवकर हा ड्रेस कोड बदलण्यात यावा अन्यथा १२ डिसेंबरपासून निघणाऱ्या पुढच्या ट्रेनचा निषेध करण्यात येईल. तसंच निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटलं होतं की, रामायण एक्सप्रेसच्या वेटरना भगवा गणवेश देणे हा तद्दन मूर्खपणा आहे. सरकारने हा निर्णय त्वरित बदलावा व ज्याने तो घेतला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली होती.

हेही वाचा: पाकिस्तानमधूनच हनी ट्रॅपचे कारस्थान; लष्करालाही ‘हनी ट्रॅप’चा धोका

दिल्लीच्या सफदरजंगपासून सुरू होणारी रामायण एक्सप्रेस ७५०० किमीचा प्रवास करेल. अयोध्येतील रामजन्मभूमी, हनुमानगढी, नंदीग्राम, सीतामढी, वाराणसी, प्रयागराज, श्रिंगवेरपुरम, चित्रकूट, पंचवटी- नाशिक, हम्पी-किष्किंधा, भद्राचलम या मार्गाने १७ दिवसांत रामेश्वरमपर्यंतची यात्रा पूर्ण करेल. या दरम्यान रस्त्याच्या मार्गाने नेपाळच्या सीता जन्मभूमीचेही दर्शन घडविण्यात येईल.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here