
5 तासांपूर्वी
उमरगा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास दीड वर्ष शाळा कुलूपबंद होत्या. दिवाळीपूर्वी शाळा, महाविद्यालय सुरू झाली होती. त्यात पुन्हा दिवाळी सुट्यांमुळे खंड पडला होता. आता शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत. मात्र, ग्रामीण भागातून शहरात अथवा नजीकच्या शाळा, महाविद्यालयांत जाण्यासाठी एसटीचा पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कोरोना संसर्गाच्या भीतीने राज्य सरकारने सावध पवित्रा घेत शाळा, महाविद्यालये टप्प्याटप्याने सुरू केली. शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. गावापासून शाळेचे अंतर अधिक असल्यामुळे अनेक मुले बसचा पास काढून शाळेत ये-जा करतात. पण, संपामुळे बसचा पर्याय उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. विशेषतः मुलींची अडचण वाढली आहे. पालकांना देखील मुलींना शाळेत कसे पाठवावे? असा प्रश्न सतावत आहे.
हेही वाचा: अकोला : गॅस सिलेंडरचा स्फोट, एक ठार तीन गंभीर
उमरगा बसस्थानकासह मुरूम व येणेगूर बसस्थानकातून ज्या- ज्या भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रवासासाठी बस पासचा पर्याय उपयुक्त ठरतो. एसटी. महामंडळाने मुलींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना सुरू केली. या योजनेत तालुक्यातील जवळपास दीड हजार मुली लाभार्थी आहेत. यात १५ शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा समावेश आहे. तर कमी दरात रक्कम भरून पास काढलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अडीच हजार आहे. दरम्यान, बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसचा पर्याय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांना अधिकचे प्रवास भाडे द्यावे लागत आहे.
प्रतिक्षेलाही मर्यादा असाव्यात
गेल्या २७ दिवसांपासून विविध न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी. कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, राज्यकर्ते व प्रशासनात तोडगा निघत नाही, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे, आज गरिबांची लालपरी बंद असल्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. बस सुरू होण्याची किती प्रतिक्षा करावी, यालाही काही मर्यादा आहेत. राज्य सरकारने पर्याय म्हणून खासगी वाहनांना मुभा दिलेली असली तरी त्यांच्याकडून आकारले जाणारे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नाही.
ज्येष्ठांची होतेय घुसमट
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात सवलत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक कामानिमित्ताने बसचा हमखास पर्याय शोधतात. मात्र, गेल्या तीन आठवड्यांपासून बस बंद असल्याने स्मार्ट कार्ड बाहेर काढण्याची संधीच मिळत नसल्याने ज्येष्ठांची घुसमट होत आहे. सध्या लग्नसराई असल्याने ज्येष्ठांना मान, सन्मान म्हणून बोलावले जाते. परंतु, डिझेल दरवाढीमुळे आणि बसच्या संपामुळे खासगी वाहनांसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने अनेक कार्यक्रमाला जाणे शक्य होत नाही.
Esakal