सिंहगड रस्त्यावरील विद्युत खांबांचा अडथळा अखेर निघणार
sakal_logo

द्वारे

निलेश बोरुडे

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फटा ते खडकवासला दरम्यान रस्त्याच्या कामात असलेला विजेच्या खांबांचा अडथळा अखेर निघणार आहे. सदर कामाचे तीन कोटी बावन्न लाखांचे सुधारित इस्टीमेट महावितरणकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. ‘वर्षभर पाठपुरावा करुन सुधारित इस्टीमेट मिळत नव्हते, ‘सकाळ’मध्ये बातमी आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत इस्टीमेट मिळाले’, अशी भावना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नांदेड फाटा व किरकटवाडी फाटा परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झालेला आहे. त्यातच रस्त्याच्या कडेने विजेच्या खांबांचा अडथळा असल्याने पर्यायी रस्ता करणे अशक्य आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून नांदेड सिटी गेट ते खडकवासला दरम्यान सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत.रस्त्याच्या कामात व वाहतुकीस विजेच्या खांबांचा अडथळा येत असल्याबाबत दै. ‘सकाळ’ने दि. 3 नोव्हेंबर रोजी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अगोदर जबाबदारी झटकणाऱ्या व इस्टीमेट अगोदरच दिलेले आहे असे म्हणणाऱ्या महावितरणने अखेर विजेच्या खांब काढून विजवाहीन्या भूमिगत करण्याचे सुधारित इस्टीमेट सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

चार मीटरने रस्त्याची रुंदी वाढणार

किरकटवाडी फाट्याजवळ खांबांचा अडथळा असल्याने सध्या दहाच मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात येत आहे. महावितरणने खांब काढून वीजवाहीन्या भूमिगत करण्याचे इस्टीमेट दिल्याने या ठिकाणी दोन्ही बाजूंना दोन-दोन मीटरने रस्त्याची रुंदी वाढणार आहे. परिणामी किरकटवाडी फाट्याजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

“इस्टीमेट देण्यास टाळाटाळ होत असल्याची माहिती सकाळमधून मिळाल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नागरिकांची गैरसोय होत असल्याने पंधरा दिवसांत इस्टीमेट मिळाले नाही तर महावितरणच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता.” – विजय मते, खडकवासला विधानसभा अध्यक्ष, मनसे.

” आवश्यक ती दुरुस्ती करुन नांदेड सिटी गेट ते खडकवासला दरम्यानचे महावितरण संबंधित कामाचे सुधारित इस्टीमेट सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.” – मनीष सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता, महावितरण.

“आम्ही वर्षभर पाठपुरावा करत होतो. सकाळमध्ये बातमी आल्यानंतर काही दिवसांतच सुधारित इस्टीमेट महावितरणकडून मिळाले. संबंधित ठेकेदाराला इस्टीमेट पाठविण्यात आले आहे. तातडीने काम करुन घेण्यात येणार आहे.” – ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here