
5 तासांपूर्वी
नवी दिल्ली : इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी भारत उपाययोजना करत आहे. अमेरिका, जपान आणि इतर प्रमुख अर्थव्यवस्थांसोबत मिळून आपत्कालीन साठ्यातून ५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल (Crude Oil) सोडण्याची योजना आखली आहे. याबाबत एका सरकारी अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली, तर इंधनाच्या किंमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? कच्च्या तेलाच्या किमतींत घट सुरुच
भारत पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील तीन ठिकाणी कच्च्या तेलांचा साठा करतेय. याठिकाणी सुमारे ३८ दशलक्ष बॅरल कच्चे तेल साठवले आहे. त्यापैकी येत्या ७-८ दिवसांत ५ दशलक्ष बॅरल तेल सोडण्यात येईल, अशी माहिती आहे. त्यानंतर हा साठा मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांना विकला जाणार आहे. यासाठी काही दिवसांत औपचारीक घोषणा करण्यात येईल. तसेच उर्वरीत साठ्यातून आणखी तेल सोडायचे की नाही हे देखील सांगितले जाईल, असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमती अधिकच वाढल्या आहेत. त्यावरील टॅक्स कमी करून केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमती जास्त असल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या. आता भारताने कच्चे तेल सोडले तर इंधनाच्या किंमतीमध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे.
Esakal