
5 तासांपूर्वी
पुणे : भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वाची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी, तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत, यासाठी संविधानाची परिपूर्ण ओळख विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. या विचारातून शालेय शिक्षण विभागाने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘माझे संविधान, माझा अभिमान’ हा उपक्रम मंगळवारपासून (ता.२३) ते शुक्रवारपर्यंत (ता. २६) दरम्यान आयोजित केला आहे.
या उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘भारतीय संविधान’, ‘माझ्या शाळेतील संविधान दिवस’ विषयावर वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी स्पर्धा होत आहेत. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘संविधान यात्रा/संविधान निर्मितीचा प्रवास’, ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’, ‘भारतीय संविधान आणि लोकशाही’ विषयावर वक्तृत्व, निबंध लेखन, घोषवाक्ये, पोस्टर निर्मिती, स्वरचित काव्यलेखन अशा स्पर्धा घेण्यात येणार आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय संविधानिक मूल्ये, ‘भारत देशापुढील सद्यःस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान’, ‘सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे’, ‘भारत देशाचा सन्मान, माझे भारतीय संविधान’ विषयावर विविध स्पर्धा होणार आहे.
या उपक्रमांतर्गत प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी देखील फलक लेखन, डिजिटल पोस्टर निर्मिती या स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
Esakal