
5 तासांपूर्वी
निफाड (जि. नाशिक) : केंद्राचे चुकीचे धोरण सध्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. केंद्राने कृषी कायदे मागे घेतले, पण धोरणाचे काय असा प्रश्न करून कच्चे तेल आयात केल नसते तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला असता. पण केंद्राने शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांच्या घरावर तलवार चालविली असा घणाघात करत सध्या शेतकऱ्यांना फक्त चालू वीजबिल भरण्याची सवलत मिळावी असे प्रतिपादन निफाड येथील शहीद स्मारक लोकार्पण तसेच दिव्यांग शेतकरी मेळाव्याप्रसंगी मंत्री बच्चू कडू यांनी केले.
निफाड शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज राज्यमंत्री बच्चू कडू तसेच म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या उपस्थितीत शहीद स्मारक लोकार्पण सोहळा तसेच दिव्यांग शेतकरी मेळावा झाला,त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी निफाड येथील अर्बन बँकेपासून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रॅली काढली, ती पंचायत समिती समोर येताच मान्यवरांचे पंचायत समितीतर्फे स्वागत करण्यात आले. मंत्री बच्चू कडू यांनी शहीद स्मारकाचे लोकार्पण केले.
लोकार्पणानंतर शिवाजी चौकामध्ये दिव्यांग व शेतकरी बांधवांचा मेळावा झाला. शहीद कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मंत्री कडू म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, त्यांच्या हौतात्म्यातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभले, ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, पोलिस निरीक्षक रंगाराव सानप, गटविकास अधिकारी संदीप कराड, सभापती, उपसभापती, सदस्य तसेच शिवाजीराव ढवळे, सागर निकाळे, अनिल कुंदे, शिवाजी ढेपले, विक्रम रंधवे, सोनाली चारोस्कर, सपना बागूल, शिवा सुराशे, सोमनाथ पानगव्हाणे, पंडित आहेर, विकास रायते आदींसह मान्यवर उपस्थित होते. राहुल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा: नाशिक : सासरच्या जाचाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या
चालू वीजबिल भरण्याची सवलत द्या
आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना सेवेचा विसर पडू देऊ नका असे सांगताना नेत्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे होर्डिंग लावण्याऐवजी गरिबांच्या झोपडीवर छत टाकणे जास्त चांगले राहील. आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झालेली असून थकीत वीज बिल भरण्याची ताकद त्याच्यात उरलेली नाही, त्यामुळे आजच्या घडीला शेतकऱ्यांना फक्त चालू बिल भरण्याची सवलत मिळावी. उद्योगपतींच्या हितासाठी सरकारने तेल आयातीचा निर्णय घेतला परंतु त्याचा फटका सोयाबीनचे भाव प्रचंड कोसळण्यात झाला.
हेही वाचा: नाशिक : ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध
Esakal