
अकोला : लसीकरण केंद्रांची संख्या घटणार!
5 तासांपूर्वी
अकोला : जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. तथापि, या अभियानानंतर अभियानानिमित्त वाढविण्यात आलेली लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० नोव्हेंबरच्या आत आपल्या घराजवळ असलेल्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी विशेष मोहिम राबविली जात असून आज अखेर जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या लोकांची संख्या ९ लाख २७ हजार इतकी असून दूसरा डोस घेतलेल्यांची संख्या ४ लाख २१ हजार ७०० इतकी आहे. जिल्ह्यात १८ वर्षे वयावरील लसीकरणासाठी पात्र १४ लक्ष ३३ हजार व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा: कृषी पंपाची जोडणी कापण्याचा सपाटा! शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
त्यादृष्टीने सद्यस्थितीत १५० लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात लोकांच्या घरांच्या जवळ, एकाच वेळी अधिक लोकांसाठी त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या नजिक विशेष सत्र आयोजित करण्यात होते. तसेच लोकांच्या सोयीनुसार लसीकरण वेळही बदलण्यात येत आहे. तथापि, अभियान कालावधीनंतर (ता. ३०) वाढवलेली केंद्र संख्या कमी होईल. तेव्हा नागरिकांनी आता अधिक जवळ केंद्र आहेत तेथे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
Esakal