
‘अ’ ऑनलाइनचा : अभ्यासाचा मूलमंत्र : मनन व चिंतन
२४ नोव्हेंबर २०२१
खरा अभ्यास हा सततच्या मनन आणि चिंतनानेच होतो. पाठांतराने, परत परत वाचल्याने किंवा लिहीत बसल्याने नाही. खरा अभ्यास करण्याकरीता कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसते. त्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे आपल्या स्वतःशीच केलेला मुक्त संवाद. असा हा मुक्त संवाद अगदी कोठेही आणि केव्हाही होऊ शकतो. त्यासाठी ठरवून दिलेली जागाच पाहिजे असे नाही. अगदी शाळेला येता जाता बस मधून, रिक्षामधून, घरातल्या घरात किंवा बागेत फिरताना. आपणच आपल्याला शिकवणे यासारखा अभ्यासाचा सोपा उपाय नाही. तो अगदी कुणीही करू शकतो केव्हाही, कुठेही!
मनन याचा अर्थ विचार करणे. चिंतन करणे म्हणजे ध्यास घेणे किंवा ध्यान करणे. एकाग्र चित्ताने, सतत केलेला विचार. अभ्यासासाठी केलेले हे चिंतन, मनन खात्रीपूर्वक उपयुक्त ठरू शकते.
अभ्यासाच्या नावाने आपण सतत लिहीत तरी सुटतो किंवा वाचत तरी बसतो. परंतु आवश्यक असते ते म्हणजे आपल्या विषयातील माहिती, ज्ञान, संकल्पना आपण किती प्रमाणात आत्मसात करतो ते. ते करण्यासाठी केवळ एकाग्र चित्ताने, विचाराने प्रत्येक गोष्ट आठवून पाहणे. मग कोणताही विषय घ्यावा. त्यातील संकल्पना डोक्यात आणून स्वतःच मनाला प्रश्न विचारून स्वतःच त्याची उत्तरे मनातल्या मनात देण्याचा सराव करावा. या वेळेस मनात दुसरे विचार डोकावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटलेलेच आहे, ‘तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी…’
स्व-संवादाचे फायदे
-
स्वतःशीच केलेल्या या संवादातूनच आपल्या मनाला विचार करण्याची शक्ती लाभते.
-
यातूनच सर्जनशीलता आणि कल्पनारम्य विचार करण्याची ताकद निर्माण होते.
-
एखादी समस्या, प्रश्न, अडचण घ्यावी आणि त्यामागची कारण, परिणाम, उपाययोजना या विषयी विचार करायला लागावे.
-
यासाठी ब्रेन स्टॉर्मिंग अर्थात मनात वेगवेगळे विचार येऊ द्यावेत. त्या विचारांना प्राधान्यक्रम द्यावा. स्वतःच्या नादात राहून अगदी सभोवतालचा विसरच पडला आहे असे मात्र होऊ देता कामा नये.
-
परिस्थितीचे भान ठेवून, जाणिवांचा विचार करून असा हा केलेला अभ्यास स्वतःमधील सामर्थ्य वाढवायला नक्कीच उपयुक्त होईल.
-
स्वतःच्या मनाला विविध प्रश्न विचारून त्याची उत्तरे स्वतःच मिळविल्याने मनन आणि चिंतनात भर पडते, आत्मविश्वास निर्माण होतो. अभ्यास आपल्या डोक्यात राहातो.
Esakal