
संधी करिअरच्या… : विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण
२४ नोव्हेंबर २०२१
भारतात आजमितीला १५ ते ५५ या वयोगटातील लोकसंख्या जगात सगळ्यांत जास्त आहे. खरे तर इतर देशांनी या बाबतीत आपला हेवा करावा अशीच ही परिस्थिती आहे; परंतु आपल्याकडे सर्वच पातळ्यांवर या हातांना रोजगार कसा मिळवून द्यावा, याची चिंता वाटते आहे. गेल्या काही वर्षांत शिक्षणाचा वाढता प्रसार, संघटित क्षेत्रातील घटणाऱ्या रोजगार संधी या पार्श्वभूमीवर शिक्षित बेरोजगारीची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. आजही रोजगार म्हणजे नोकरी हाच विचार केला जातो . ‘उत्तम नोकरी, कनिष्ठ व्यवसाय’ ही मानसिकता मुलांमध्ये रुजवली जाते. जागतिकीकरणाच्या रेट्यात संघटित क्षेत्रांत, तसेच शासनामध्ये नोकरीच्या फार मोठ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाही हे लक्षात घेता बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नावर ‘स्वयंरोजगार’ हा एकमेव प्रभावी उपाय आहे, यात शंका नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था यांसाठी विविध पातळ्यांवर तरुणांना कौशल्य शिकवून स्वयंरोजगारासाठी उद्युक्त करत आहेत, काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनीही यासाठी पुढे येऊन विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याची क्रांतिकारी संकल्पना राबवली आहे. पुणे जिल्ह्यातील अशा काही संस्थांची माहिती घेऊ यात.
रुडसेट इन्स्टिट्यूट
पद्मभूषण डॉ. वीरेंद्र हेगडे या द्रष्ट्या समाजसेवकाने धर्मस्थळ मंजुना शेखर संस्थेच्या माध्यमातून एक ज्ञानयज्ञ उभारला. सिंडिकेट बॅंक व कॅनरा बँक या दोन बॅंकांनी त्यांना मोलाची साथ दिली आणि या कार्याचा संपूर्ण भारतभर प्रसार होऊन कर्नाटक, केरळ, ओडिशापासून दिल्ली, राजस्थानपर्यंत अकरा राज्यांत गुरुकुल पद्धतीने स्वयंरोजगार प्रशिक्षण देणारी अनेक केंद्रे उभी राहिली. आजपर्यंत या कार्यातून लाखो तरुणांना प्रशिक्षण मिळाले आहे व त्यातील जवळपास ७०% युवकांनी स्वयंरोजगार सुरू करून त्यात यशही मिळवले आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत एकच केंद्र आहे. तळेगाव दाभाडे येथे ‘ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था’ अर्थात रुडसेट इन्स्टिट्यूट या नावाने १९९९मध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले. १८ ते ४५ वयोगटातील दहावी पास/नापास युवक/ युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण येथे दिले जाते. हे संपूर्ण प्रशिक्षण गुरुकुल पद्धतीने दिले जात असल्याने प्रशिक्षणार्थींनी कोर्सचा कालावधी संपेपर्यंत संस्थेतच राहणे आवश्यक असते. हे संपूर्ण प्रशिक्षण, प्रशिक्षणाचे साहित्य, निवास व भोजन या सर्व गोष्टी संपूर्णपणे विनामूल्य आहेत. येथे एक ते आठ आठवड्यांचे विविध कोर्सेस चालवले जातात ज्यात कुक्कुटपालन, शेळीपालन, गांडूळखत तयार करणे, दुग्धव्यवसाय, फोटोग्राफी, टेलरिंग, ब्युटी पार्लर (स्त्री व पुरुष), मोबाईल दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्ती, बांबू/केन क्राफ्ट असे विविध कोर्सेस आहेत. याचा आजवर दहा हजारांहून अधिक तरुण/तरुणींनी लाभ घेतला आहे. प्रशिक्षणानंतर दोन वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेतला जातो. संपर्कासाठी संस्थेचा पत्ता पुढीलप्रमाणे :
रुडसेट इन्स्टिट्यूट, वराळे रोड, ईगल ऍग्रो फार्मजवळ, तळेगाव दाभाडे ४१०५०७ , फोन क्रमांक ०२११४- २९७१११.
(पुढील लेखात महाबॅंक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व बरोडा स्वयंरोजगार विकास संस्था या दोन संस्थांची माहिती घेऊयात.)
Esakal