
जनता मार्केटमध्ये व्यापारी संकुल होणार
5 तासांपूर्वी
नांदेड : शिवाजीनगर भागातील महापालिकेच्या जनता मार्केट आणि परिसराचा बिओटी तत्वावर विकास करण्यात येणार असून त्या दृष्टीने याबाबतचा निर्णय महापालिकेच्या सोमवारी (ता. २२) झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या ठिकाणी तळमजला आणि तीन मजली तीन तर तळ मजला आणि चार मजली एक अशा एकूण चार इमारती बांधण्याचा प्रस्ताव आहे. महापालिकेची शिवाजीनगर भागात जनता मार्केट येथे जागा आहे. सध्या या ठिकाण भाग एकमध्ये २० व्यापारी गाळे तर भाग दोनमध्ये ४६ व्यापारी गाळे आहेत. ही इमारत ४४ वर्षे जुनी आहे. त्यामुळे इमारतीची गुणवत्ता आणि उपयुक्तता तपासून सदरची इमारत पाडणे आवश्यक असल्याचा अभिप्राय देण्यात आला होता.
त्यानुसार या ठिकाणी नव्याने सर्व सोयीसुविधांनी परीपूर्ण व्यापारी संकुल उभारणे आवश्यक आहे. त्यानुसार सभेत निर्णय घेण्यात आला. नांदेडची वाढती लोकसंख्या तसेच शहराचा होत असलेला विकास लक्षात घेता सुरक्षित व सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने पर्यायी तसेच अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक आहे. शिवाजीनगरमधील जनता मार्केट, घमोडिया फॅक्टरी, डॉक्टर लेन आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेली वर्दळ लक्षात घेऊन या ठिकाणी अस्तित्वातील सुविधांचा विकास करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनातर्फे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यामार्फत हा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा: गुंठेवारी नियमितचे शुल्क हप्त्याने शक्य – एकनाथ शिंदे
महापालिकेच्या जनता मार्केट जुनी व क्षतीग्रस्त झाल्यामुळे ती पाडणे आवश्यक होते. आता त्या ठिकाणी बिओटी तत्वावर नवीन चार इमारती बिओटी तत्वावर विकसीत करण्यात येणार आहेत. यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
– जयश्री निलेश पावडे, महापौर.
हा प्रस्ताव शहर विकासाला चालना देणारा असून हे मार्केट शहराचे आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेचा एकही रुपया खर्च होणार नाही आणि बिओटी तत्वावर बहुमजली इमारत उभी राहणार आहे. महापालिकेला देखील त्यातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.
– विरेंद्रसिंग गाडीवाले, सभापती, स्थायी समिती.
अशा राहणार प्रस्तावित सुविधा
१) जनता मार्केट – भाग एक : चार मजली ः एकूण वाणिज्य गाळे : ४४
२) जनता मार्केट – भाग दोन : तीन मजली : एकूण वाणिज्य गाळे : ७६
३) जनता मार्केट – विंग बी – वन : तीन मजली : एकूण रहिवास गाळे : २१, एकूण वाणिज्य गाळे : दोन
४) जनता मार्केट – विंग बी – टू : तीन मजली : एकूण रहिवास गाळे : २७, एकूण वाणिज्य गाळे : ११
Esakal