
5 तासांपूर्वी
अंबाजोगाई : तालुक्यातील तडोळा शिवारात नऊ वर्षांपूर्वी जमिनीच्या वादातून घडलेल्या दुहेरी खुनाच्या आरोपात मंगळवारी (ता.२३) येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी. पटवारी यांनी चार जणांना दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड व याच घटनेतील इतर दोघांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. घटनेतील ५ महिला आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.
वांगदरी (ता. रेणापुर) येथील वसंत मुकूंदराव कराड यांची तडोळा शिवारात गट क्र.१४७ व १४८ मध्ये जमीन आहे. त्यांनी या जमिनीत उसाची लागवड केली होती. ता.१६ एप्रिल २०१२ रोजी त्यांच्या शेता शेजारील काही लोक ऊस तोडून घेऊन जात होते. यावेळी तिथे लक्ष्मण गंभीरे, गणेश गंभीरे हेही उपस्थित होते. वसंत कराड यांनी ऊस तोडणाऱ्यांना जाब विचारला असता, मदन ग्यानदेव पुजारी, महादेव ग्यानदेव पुजारी, अंकुश ग्यानदेव पुजारी व बळीराम ग्यानदेव पुजारी यांच्यासह ११ जणांनी हातातील कोयता व कुऱ्हाडीने त्यांना डोक्यात, पाठीवर गंभीर जखमा केल्या व साक्षीदार गणेश गंभीरे, बबन कराड यांनाही मारहाण केली.
हेही वाचा: औरंगाबाद : आंध्रातून ४० किलो गांजा मागविणारा अखेर अटकेत
या हल्ल्यात वसंत मुकुंदराव कराड, लक्ष्मण गंभीरे, गणेश गंभीरे, बबन कराड हे गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात दाखल केले. यावेळी उपचार सुरू असतानाच वसंत मुकुंदराव कराड यांचा मृत्यू झाला. दुसरे गंभीर जखमी असलेले लक्ष्मण नरहरी गंभीरे यांचाही मृत्यूही मृत्यू झाला. या घटनेचा गणेश सुदाम गंभीरे यांच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलिस ठाण्यात तडोळा येथील ११ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यात पाच महिलांचा समावेश होता. बर्दापुर पोलिसांनी या घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. बी. पटवारी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.
न्यायाधीशांनी घटनेतील जखमी, डॉक्टरांचा उत्तरीय तपासणी अहवाल व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून मदन ग्यानदेव पुजारी, महादेव ग्यानदेव पुजारी, अंकुश ग्यानदेव पुजारी व बळीराम ग्यानदेव पुजारी यांना खुनाच्या आरोपात दोषी ठरवत जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. साक्षीदाराला मारहाण केल्याच्या आरोपात अरुण ग्यानदेव पुजारी, राजकुमार ग्यानदेव पुजारी यांना दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण फड यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. अनंत तिडके यांनी सहकार्य केले. पोलिस जमादार गोविंद कदम व बी. एस. सोंडगिर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Esakal