
5 तासांपूर्वी
‘लव्हयात्री’ सिनेमातनं बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेला अभिनेता आयुष शर्मा(Aayush Sharma) हा सिनेमामुळे लक्षात राहिला नाही पण सलमान खानचा मेव्हणा म्हणून मात्र त्याची कायमची ओळख बनून गेली. सलमान हा त्याचा इंडस्ट्रीतला मोठा सपोर्ट आहे. आतापर्यंत त्याने केलेल्या सिनेमांची निर्मितीही सलमानने(Salman Khan) केलीय. पण हा सपोर्ट त्याला भारी पडलेला दिसतोय. कारण त्याच्याकडे इतर निर्माते कधी सिनेमे घेऊन आलेच नाहीत,आणि त्याचे सिनेमे प्रदर्शित होताना त्याच्या सिनेमांपेक्षा सलमान त्याचा मेव्हणा म्हणून सलमानच्याच बातम्या होऊ लागल्या. याचा मोठा फटका त्याच्या करिअरला बसला.
हेही वाचा: ”मला शुभेच्छांपेक्षा सध्या कामाची गरज आहे”
आयुष शर्मा ब-याच दिवसांनी आता एका मोठ्या सिनेमातनं खलनायक म्हणून आपल्याला दिसणार आहे. महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) दिग्दर्शित या सिनेमाचं नाव आहे ‘अंतिम-द फायनल ट्रुथ.’ या सिनेमाची निर्मितीही सलमाननं केलीय. सलमान या सिनेमात हिरोची भूमिका करतोय. आता या सगळ्याचं दडपण आयुषला आलं नसतं तर नवलंच. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं आपल्याला नेपोटिझमची भिती वाटते हे त्यानं नुकतच बोलून दाखविलं होतं. येत्या 26 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होतोय.

सलमान खान, आयुष शर्मा
अंतिम सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आयुषनं दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला की, “लव्हयात्री या सिनेमाचे जेव्हा मी रिव्ह्यू वाचले तेव्हा मी माझ्याच बाबतीत खूप नकारात्मक विचार करायला लागलो होतो. कारण एका वरिष्ठ पत्रकाराने रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं,हा हिरो मुलीसारखा दिसतो,कुणी लिहिलं होतं,या हिरोच्या चेह-यावर भावच नाहीत,आवाजात दम नाही,कुणी म्हटलं होतं,याचं काहीच करिअर नाही,सलमान आहे म्हणून हा आहे. पण या सगळ्या मतांवर मी शांत राहून विचार केला. हे माझ्या चांगल्यासाठीच आहे असा मी विचार करायला लागलो. मी यावर काम केलं पाहिजे. आणि हे सगळं करताना पत्रकारांनी सूचित केलेले हे मुद्दे मी माझ्या फोनचा वॉलपेपर म्हणून ठेवले होते.

आयुष शर्मा
हे माझ्या चांगल्यासाठीच आहे असा मी विचार करायला लागलो. आणि मग आज तुम्ही अंतिममध्ये माझी बॉडी पाहाताय ते त्यामागचेच कष्ट आहेत. मी माझ्या आवाजावर काम केलं,अॅक्टिंग सुधारण्याचा प्रयत्न केला. माझ्या मेहनतीला यश मिळवून देण्याचं काम आता प्रेक्षकांच्या हातात आहे.
Esakal