
5 तासांपूर्वी
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुप कुमरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे गांभीर्याने न घेतल्याने न्यायालयाने त्यांना अवमान नोटीस बजावली आहे. हनुमान पेंदाम असे या याचिकाकर्त्याचे नाव असून या प्रकरणात कुमरे न्यायालया समक्ष आज हजर झाले होते.
या प्रकरणी न्यायमूर्ती एस. एम. मोडक आणि न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, कारागृह अधीक्षकांनी अधिकारांचा गैरवापर करीत पात्र कैद्यांना जाणीवपूर्वक पॅरोल नाकारला, असा आरोप एका याचिकेद्वारे करण्यात आला आहे. त्याला खुनाच्या आरोपात शिक्षा सुनावण्यात आली असून त्याने आठ वर्षे कारावास भोगला आहे. एकदा त्याला मिळालेली संचित रजा संपवून त्याने समर्पण केले. मात्र, त्याच्याकडे कोव्हिड-१९ निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र नसल्याचे सांगत त्याचे समर्पण कारागृहाकडून नाकारण्यात आले.
पुढे त्याला अटक करण्यात आली. याच घटनेचा दाखला देत अनेकदा त्याचे पॅरोल अर्ज फेटाळण्यात आले. मात्र, कारागृहातील काही अन्य बंदीवानांना सर्रास पॅरोल मिळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. नागपूर पोलिस आयुक्तांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या प्रकाराची स्वतंत्र चौकशी करावी तसेच कारागृह विभागाने कुमरेंविरुद्ध विभागीय चौकशी करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. दरम्यान न्यायालयापुढे चुकीची माहिती सादर करण्याचे तसेच न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याची कुमरेंची ही पहिली वेळ नसल्याचे मत नोंदवीत न्यायालयाने त्यांना अवमान नोटीससुद्धा बजावली होती. कुमरेंनी उत्तर दाखल करण्यास ८ आठवड्यांचा अवधी मागितला. यावर न्यायालयाने त्यांना ६ आठवड्यांची मुदत दिली.
Esakal