
पिंपरी : राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे पद रद्द करण्याचा आदेश
5 तासांपूर्वी
पिंपरी – कोरोना काळात एडिसन लाइफ सायन्स कंपनीने महापालिकेला थेट पद्धतीने मास्कचा पुरवठा केला होता. त्या कंपनीशी संबंध सिद्ध झाल्यामुळे संत तुकारामनगर प्रभागातून प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचे पद रद्द करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी (ता. २४) दिला.
शहरातील नागरिकांना वाटप करण्यासाठी दहा लाख रुपयांच्या मास्कची थेट खरेदी महापालिकेने केली होती. यापैकी ‘एडिसन’ने एक लाख मास्कचा प्रतिनग दहा रुपये प्रमाणे पुरवठा केला होता. त्यापोटी दहा लाख रुपये महापालिकेने कंपनीला दिले. मात्र, लोकप्रतिनिधींशी संबंधित कंपनी अथवा संस्थेला आर्थिक फायद्यासाठी निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदविता येत नाही.
हेही वाचा: देहू नगरपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले
मात्र, नगरसेविका शिलवंत यांचे पती राजू धर व त्यांचे बंधू राजरत्न शिलवंत हे ‘एडिसन’ कंपनीचे संचालक असल्याचा आक्षेप माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर विभागीय आयुक्तांना सहा आठवड्यात निर्णय घेण्यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिले होता. त्यानुसार चौकशी करून, विभागीय आयुक्त राव यांनी बुधवारी अंतिम निकाल दिला. त्यात म्हटले आहे की, एडीसन कंपनीशी व मास्क खरेदी प्रक्रियेत शिलवंत यांचा संबंध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिका सदस्य शिलवंत यांना पदावरून अनर्ह करावे. दरम्यान, नगरसेविका शिलवंत म्हणाल्या, ‘‘विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अद्याप मिळालेली नाही. ती वाचल्याशिवाय त्या बाबत काहीही सांगता येणार नाही.’’
Esakal