
२५ नोव्हेंबर २०२१
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, शहराच्या विविध भागांतील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. सर्वाधिक खड्डे तिसरे रेल्वे गेट परिसरात आणि टिळकवाडीच्या विविध भागांत पाहावयास मिळत आहेत.
शहराच्या अनेक भागांत स्मार्ट सिटीअंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच अनेक ठिकाणी खोदाई केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. त्यामुळे वडगाव, अनगोळ, शहापूर, तिसरे रेल्वे गेट, जुना धारवाड रोड आदी भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्यानंतर त्या रस्त्यांची डागडुजी करण्याऐवजी खड्ड्यामध्ये भराव घालून वेळ मारून नेण्यात आली होती. त्यामुळेच शहरात अवेळी पडत असलेल्या पावसामुळे खड्ड्यात भर पडली आहे. अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीलाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने आणि इतर संबंधित विभागाने आपल्या अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे बनले आहे. रस्त्यांची डागडुजी त्वरित न झाल्यास वाहनचालकांच्या समस्येत भरपडणार आहे.
तिसऱ्या रेल्वे गेटजवळ समस्या
तिसरे रेल्वे गेट येथे शहरातील चौथ्या उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे अगोदरच या भागात समस्या निर्माण झाली आहे. आता तिसरे रेल्वे गेट भागात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यात पडून अपघातात वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे या भागातील सर्वच खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. तसेच तिसरे रेल्वे गेट ते उद्यमबाग व दुसऱ्या रेल्वे गेटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे या भागातील खड्डे बुजवणे गरजेचे बनले आहे. दररोज सकाळ, संध्याकाळी येथे वाहतूक कोंडी होत आहे. मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
“तिसरे रेल्वे गेट येथे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. कामावर वेळेवर पोहोचण्यास अनेकांना अडचण निर्माण होत आहे. याची दखल घेत येथील समस्या दूर करणे गरजेचे बनले आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी नादुरुस्त होत आहेत.”
– राहुल मोरे, दुचाकीचालक
Esakal