
भास्कर डॉन गँगवार ‘मोका’ अंतर्गत कारवाई
5 तासांपूर्वी
कोल्हापूर: गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जवाहरनगरातील भास्कर डॉन गँगमधील पाच जणांवर ‘मोका’ची कारवाई करण्यात आली. याबाबतच्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. अमोल महादेव भास्कर, महादेव शामराव भास्कर, अमित ऊर्फ पिंटू महादेव भास्कर, शंकर शामराव भास्कर आणि संकेत सुदेश व्हटकर अशी त्यांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा: पालकमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ; धनंजय महाडिक यांचा आरोप
सेवानिवृत्तीनंतर एका ज्येष्ठ नागरिकाने जवाहरनगरात एक प्लॉट घेतला. तो प्लॉट हडपण्याच्या उद्देशाने दमदाटी व धमकी दिल्या प्रकरणी भास्कर गँगच्या संशयित अमोल, महादेव, अमित, शंकर भास्करसह संकेत व्हटकर या पाच जणांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. या गँगविरोधात संघटित गुन्हेगारीअंतर्गत दखलपात्र, गंभीर स्वरूपाचे एकूण ४८ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपसात पुढे आली. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दुखापत, गर्दीमारी, जबरी चोरी, चोरी, खंडणी आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.
राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी संबंधित गँगविरोधात मोकाअंतर्गत प्रस्ताव तयार केला. तो मंजुरीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. या गुन्ह्याचा तपास जयसिंगपूर पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वेंजणे यांच्याकडे देण्यात आला असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
हेही वाचा: ‘स्वच्छ भारत अभियान’ समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी राहुल शेवाळे
५२ जणांवर कारवाई
पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात मोकाअंतर्गत सात टोळ्यांमधील ५२ संशयितांवर कारवाई झाली. या महिन्यातील ही चौथी कारवाई ठरली. नऊ समाजकंटकांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Esakal