सलमान खुर्शीद
sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Congress Leader Salman Khurshid) यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून (Salman Khurshid Book Controversy) वाद निर्माण झाला होता. त्यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयानं याचिका फेटाळली आहे. भावना दुखावल्या असतील तर दुसरं काहीतरी चांगलं वाचू शकता, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकामध्ये खुर्शीद यांनी हिंदूत्वाची तुलना थेट दहशतवादी संघटनांशी करत हिंदूत्वादाच्या राजकारणावर भाष्य केलं होतं. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या या पुस्तकावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे भावना दुखावल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. ”इथं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित नाही. कोणत्याही व्यक्तीला इतरांच्या भावना दुखावण्याचा अधिकार नाही”, असं याचिकाकर्त्यानं म्हटलं होतं. त्यानंतर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली.

सुनावणी घेताना न्यायालयानं म्हटलं की, ”तुम्ही लोकांना ते पुस्तक विकत घेऊ नका किंवा वाचू नका असे का सांगत नाही? प्रत्येकाला सांगा की पुस्तक वाईटरित्या लिहिलेले आहे आणि ते वाचू नका. जर भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते दुसरं काहीतरी चांगलं वाचू शकतात.”

हे प्रकरण संपूर्ण पुस्तकाशी संबंधित नसून एका उताऱ्याशी आहे. तुम्हाला प्रकाशकाचा परवाना रद्द करायचा असेल तर ते वेगळं प्रकरण आहे, असंही न्यायालयानं म्हटलं. दरम्यान, सलमान खुर्शीद यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. आपल्या पुस्तकाचा लोकांना भडकावणे हा उद्देश नसल्याचे खुर्शीद म्हणाले होते.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here