
हिवाळी अधिवेशन : केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार
5 तासांपूर्वी
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय रणनीती गटाची नुकतीच बैठक झाली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी शेतकरी आंदोलन, चीनची आक्रमकता आणि महागाई या प्रमुख विषयांवरुन सरकारला घेरण्याबाबत चर्चा झाली. राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही माहिती दिली. येत्या २९ नोव्हेंबरपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
खर्गे म्हणाले, शेतकऱ्यांच्या पीकाला हमीभाव मिळावा तसेच लखीमपूर प्रकरणात नाव असलेले केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सर्व विरोधीपक्षांच्या नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा द्यावा यासाठी काँग्रेस प्रत्यक्ष सर्वांशी संपर्क साधणार आहे.
काँग्रेस नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतच्या प्रश्नावर खर्गे म्हणाले, काँग्रेस नेत्यांचं टीएमसीत जाणं हे एखाद्या कट-कारस्थानाप्रमाणं आहे. याकडे काँग्रेस नेते, राहुल गांधी आणि हायकमांडनं लक्ष घातलं आहे. याबाबत ते योग्य तो निर्णय घेतील. दरम्यान, कोविड काळातील गोंधळ, कोविडबाबतची नुकसान भरपाई, महागाई आणि शेतकरी आंदोलन या मुद्द्यांवर काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे.
काँग्रेसच्या या संसदीय रणनीती गटामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के. अँटोनी, आनंद शर्मा, मल्लिकार्जुन खर्गे, अधीररंजन चौधरी, के.सी. वेणुगोपाल, के. सुरेश, रवनीत बिट्टू, जयराम रमेश यांचा समावेश आहे.
Esakal