
डोक्यात फरशी मारून पिंपरीत पत्नीचा खून
5 तासांपूर्वी
पिंपरी – मुलीच्या अपहरणासंबंधित केसच्या कारणावरून पतीने पत्नीचा डोक्यात फरशी घालून खून केला. ही घटना पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथे घडली. जैनबी अनमुद्दीन चाकूरे (वय ३५, रा. अजमेरा कॉलनी, उद्यमनगर, पिंपरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
या प्रकरणी त्यांच्या चौदावर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पती अनमुद्दीन अल्लाउद्दीन चाकूरे (वय ३९) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जैनबी व अनमुद्दीन यांच्यात वाद झाल्याने ते सहा महिन्यांपासून विभक्त होते. दरम्यान, मागील महिन्यात चाकूरे यांच्या मुलीचे अपहरण झाले. याबाबत जैनबी यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर मुलीला सुधारगृहात ठेवले. अनमुद्दीन हा पंधरा दिवसांपूर्वीच पत्नी व मुलाकडे राहण्यास आला होता.
हेही वाचा: महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या; नग्नावस्थेत आढळले दोघांचे मृतदेह
दरम्यान, मंगळवारी (ता. २३) पहाटे तीनच्या सुमारास अनमुद्दीन, जैनबी व त्यांचा मुलगा घरी होते. त्यावेळी मुलीच्या अपहरणासंबंधित केसच्या कारणावरून अनमुद्दीनने जैनबी यांच्या डोक्यात फरशी घातली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Esakal