
‘आमच्या मंत्रिपदाची जास्त काळजी तुम्ही करण्याची गरज नाही. मंत्रिपद हे पैशाचा माज दाखवून कधी मिळत नाही.’
5 तासांपूर्वी
मोरगिरी (सातारा) : सत्यजितसिंह पाटणकर यांना उठता बसता माझ्या मंत्रिपदाची भीती का वाटते, मला माहीत नाही. मात्र, मला मंत्रिपद मेहेरबानीवर मिळाल्याची भाषा करता. मग, अनेक वर्षांपासून ज्या पक्षात आहात, त्यांच्या मेहेरबानीवर आपण आमदार का बनू शकला नाही? तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने तुमची निष्क्रियता ओळखूनच धनशक्तीच्या जोरावरील तुमची सत्तेची मस्ती उतरवत घरी बसवले आहे. जनतेने सात वर्षांपूर्वीच तुमचा आवाज बंद केला आहे. त्यामुळे बोलताना भान राखावे, असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsingh Patankar) यांना लगावला आहे.
मंत्री देसाई म्हणाले, ज्यांनी आजपर्यंत वर्षानुवर्षे जिल्हा बँकेचे (Satara District Bank Election) संचालकपद घेऊन केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून पाटण तालुक्यालाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केले. आता घराणेशाहीने पुन्हा त्याच पदावर मुलाला बसवून पुन्हा मागचे तेच पुढे होणार आहे. त्यामुळे आमच्या मंत्रिपदाची जास्त काळजी तुम्ही करण्याची गरज नाही. मंत्रिपद हे पैशाचा माज दाखवून कधी मिळत नाही. ते मिळविण्यासाठी जनतेचे प्रेम, कर्तृत्व आणि पक्षावरील निष्ठा लागते, याची माहिती आपण आपल्या वडिलांकडून घेतली असती तर अधिक बरे झाले असते. राज्यातील आघाडी सरकार हे तिन्ही पक्षांचे सरकार आहे. हे केवळ एका पक्षाचे सरकार नाही, याचे भान ठेवून आपली वक्तव्ये करावीत. मगच कुणाच्या मेहेरबानीवर कुणाला मंत्रिपदे मिळाली, असली बेताल वक्तव्ये करावीत.
हेही वाचा: ‘शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार’
जिल्हा बँकेची केवळ १०२ मतदारांची निवडणूक जिंकली म्हणून आपण पाटण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची निवडणूक जिंकली नाही. त्यामुळे आपला आत्ताच इतका थयथयाट बरा नाही. केवळ १४ मते घेऊन विजयाने हुरळून गेलेल्या सत्यजितसिंह यांना माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याएवढी आपली राजकीय उंची तरी आहे का?’’ आपण पाच वर्षांतून केवळ निवडणुकीपुरतेच वाड्यातून बाहेर पडता, हे जनतेलाही माहीत आहे. त्यामुळे आपणाला वाड्याबाहेरील संबंध कसे जपतात, याची कल्पना काय असणार? त्यामुळे इतरांच्या बरोबर असलेली आपुलकी, जिव्हाळ्याचे संबंध आणि घरोबा यातला फरक आपणाला काय कळणार? दोन हात करण्याची भाषा आम्हाला करू नये. आम्हीही यापुढे जशास तसे उत्तर द्यायला नेहमीच तयार आहे, असाही इशारा मंत्री देसाई यांनी पाटणकरांना दिला आहे.
हेही वाचा: NCP उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपाध्यक्षांचा राजीनामा
Esakal