
5 तासांपूर्वी
लातूर : कोरोनाची पहिली व दुसरी लाट आली तेव्हापासूनच शाळांची दारे विद्यार्थ्यांसाठी बंद झाली. शाळा बंद शिक्षण चालूचे प्रयत्न सुरू झाले. याच काळात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींकडूनच शिक्षणाचे धडे देण्यासाठी बाला (बिल्डिंग अॅज अ लर्निंग एड) उपक्रम हाती घेतला. जिल्ह्यातील पाचशे शाळात हा उपक्रम राबवण्यात येत असून, या उपक्रमाचा वर्षभरातच राज्यात बोलबाला झाला आहे. उपक्रमाला पालक व ग्रामस्थांनी रोख व साहित्य रूपाने दीड कोटीहून अधिक रुपयांची लोकवर्गणी दिली आहे. बुधवारी (ता. २४) या उपक्रमाची भुरळ जळगावकरांना पडली.
उपक्रमाची जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दखल घेतली असून, उपक्रम जळगावमध्ये राबवण्यासाठी एक पथक लातूरला पाठवला आहे. चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या नेतृत्वाखाली सरपंच, मुख्याध्यापक व शिक्षकांसह बावीस जणांचा पथकात समावेश आहे. या पथकाने सताळा व राऊचीवाडी (ता. उदगीर) तसेच कानेगाव व राणी अंकुलगा (ता. शिरूर अनंतपाळ) येथील या शाळेला भेट देऊन उपक्रमाची माहिती करून घेतली. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसोबत संवाद साधत उपक्रमासाठी दोन हजार शंभर रुपयांचे योगदान दिले.
पाचशे शाळांचा कायापालट
या उपक्रमात शाळा परिसर, झाडे, इमारतीचे पिलर, भिंती आदींतून गणित, भाषा व अन्य विषयाच्या ज्ञानाचे धडे देण्यासाठी नानाविध कल्पना राबवल्या. यातून विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना सहज समजून येऊ लागल्या. त्यानंतर उपक्रमात पालकांनीही वस्तू व निधी स्वरूपात योगदान देण्यास सुरवात केली. यातूनच मागील दीड वर्षात पालक व शिक्षकांनी दीड कोटीहून अधिक लोकसहभाग दिला. यातून कोरोनामुळे ओसाड पडलेल्या शाळा बोलक्या झाल्या. मूक साक्षीदार शाळेची इमारत प्रत्यक्ष ज्ञानाचे धडे देऊ लागली. शाळेचा कोपरा न कोपरा उपक्रमासाठी उपयोगात आणला गेला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकीकडे कोरोनाचा बोलबाला सुरू असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांत बाला उपक्रमाची लाट उसळली होती.
भूमिपुत्रांनीही जपली बांधीलकी
उपक्रमातून शाळा व तिच्या इमारतीबाबत पालक व ग्रामस्थांत आपुलकी व जिव्हाळा निर्माण झाला. तांबाळा (ता. निलंगा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बांधकाम स्मार्ट टीव्ही व वीस पंख्यासह ग्रामस्थांनी पाच लाखाच्या वस्तू दिल्या. बालामध्ये चाळीस उपक्रम असताना या शाळेत साठ उपक्रम राबवले. शाळेचे मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी कर्ज काढून उपक्रमासाठी तीन लाख रुपये दिले आहेत.
हाच धडा गिरवत शाळेचे माजी विद्यार्थी व दुसऱ्या ठिकाणी नोकरी व उद्योग करत असलेल्या भूमिपुत्रांनी या उपक्रमात योगदान दिले आहे. बोकनगाव (ता. लातूर) येथील शाळेसाठी माजी विद्यार्थी डॉ. भागुराम दाताळ यांनी शाळेत पेवर प्लॉक बसवण्यासाठी ३१ हजार रुपये तर दुसरे माजी विद्यार्थी सैन्य दलाचे जवान प्रदीप शिंदे यांनी शाळेच्या नावाची कमान करण्यासाठी ऑनलाइन वीस हजार रुपये पाठवल्याचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांनी सांगितले.
Esakal