
5 तासांपूर्वी
बेळगाव : विधिमंडळ अधिवेशनामुळे १२ ते २४ डिसेंबर या काळात बेळगावातील हॉटेलमध्ये बाहेरील प्रवाशांसाठी निवासी आरक्षण करू नये असा आदेश निवास व्यवस्था समितीचे प्रमुख डॉ. सुरेश इटनाळ यानी गुरूवारी दिला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक गुरूवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात घेण्यात आली. २०१८ साली झालेल्या अधिवेशनावेळी हॉटेलसाठी जे भाडे निश्चित करण्यात आले होते, तेच भाडे यावेळीही दिले जाईल असेही डॉ. इटनाळ यानी सांगीतले. २०१८ प्रमाणे भाडे नको, त्यात वाढ करून द्यावी अशी मागणी हॉटेल व्यावसायीकांनी केली, पण ती मान्य झाली नाही.
कोरोनामुळे हॉटेल व्यवसायाचे झालेले नुकसान व संबंधित विषयांवर चर्चा झाली, पण तरीही भाडेवाढ करण्याची मागणी मान्य झाली नाही. हॉटेल मालकांना शासनाकडून भाडेरक्कम शक्य तेवढ्या लवकर दिली जावी अशी मागणी करण्यात आली. ती मागणी मात्र बैठकीत मान्य झाली. बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी, आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ, पशूसंगोपन विभागाचे उपसंचालक डॉ. शशीधर नाडगौडा उपस्थित होते.
बेळगावात १३ ते २३ डिसेंबर या काळात विधिमंडळ अधिवेशन होत आहे. अधिवेशनसाठी येणारे मंत्री, आमदार व अधिकाऱी यांच्या निवासाची व्यवस्था नेहमीप्रमाणे शहरातील विविध हॉटेल्समध्ये केली जाणार आहे. त्यासाठी ६५ हॉटेल्सची यादी तयार करण्यात आली आहे. या ६५ हॉटेल्समध्ये मिळून १ हजार ७८० खोल्या उपलब्ध आहेत. त्या सर्व खोल्या एक दिवस आधीपासून म्हणजे १२ डिसेंबरपासून राखीव ठेवण्यास बैठकीत सांगण्यात आले. अधिवेशन २३ रोजी संपणार असले तरी २४ पर्यंत खोल्या आरक्षीत ठेवल्या पाहिजेत असेही सांगण्यात आले. या काळात वरील १ हजार ७८० खोल्या अन्य कोणालाही उपलब्ध करून देवू नयेत असाही आदेश बजावण्यात आला.
त्यामुळे अधिवेशन काळात बेळगावात येणाऱ्यांची गोची होणार हे नक्की आहे. पण प्रशानाचा आदेश असल्यामुळे हॉटेलमालकाना त्याचे पालन करावेच लागणार आहे. येत्या आठवडाभरात सर्व हॉटेल्समध्ये निर्जंतुकीकरण करून घेण्याची सूचनाही यावेळी देण्यात आली. हॉटेलमध्ये ज्या टाक्यांमधून पाणीपुरवठा होतो, त्या टाक्यांची स्वच्छता करण्यास सांगण्यात आले. आठवडाभरातनंतर समितीकडून सर्व हॉटेल्सची पाहणी केली जाणार आहे. त्यावेळी कोणत्याही त्रूटी आढळून येता कामा नयेत असेही बजावण्यात आले. अधिवेशन काळात हॉटेल्समध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जावे. प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनींग केले जावे अशी सूचनाही देण्यात आली. बैठकीला सर्व हॉटेलमालक उपस्थित होते. त्यानी प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल असे सांगीतले.
Esakal