Movie Review; पोरकट, बालिश अन् उथळ हेच 'अंतिम - सत्य'

Movie Review; पोरकट, बालिश अन् उथळ हेच ‘अंतिम – सत्य’

sakal_logo

द्वारे

युगंधर ताजणे

मुंबई – प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपण मराठीत ज्या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्या मुळशी पॅटर्नचा रिमेक बनवत असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात ओढ होती. त्यात बॉलीवूडचा भाईजान नेहमीप्रमाणे सुपर कॉपच्या भूमिकेत दिसणार होता. बॉलीवूडमध्ये त्याचा स्वताचा युएसपी हा कॉपच्याच भूमिकेत असल्याचे आपल्याला यापूर्वीच्या त्याच्या चित्रपटातून दिसून येईल. मग तो दबंगपासून ते टायगर जिंदा है पर्यत. त्यात कधी तो पोलीस इन्स्पेक्टर असतो तर गुप्तहेर. चाहत्यांची त्याला प्रचंड लोकप्रियताही मिळते. मांजरेकर यांच्या अंतिमध्ये त्यानं राजवीर सिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. मात्र त्याच्या इतर चित्रपटाप्रमाणे ती फारशी प्रभावी नाही हे सांगावं लागेल.

सलमानच्या नावावर चित्रपट हिट होतो. भलेही कथा कशीही का असेना त्याचं स्टारडम एवढं मोठं आहे की चाहत्यांना तो पडद्यावर दिसणं हेच जास्त महत्वाचं असतं. काही महिन्यांपूर्वी सलमानचा राधे नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्या वेगानं तो आला त्याच वेगानं बॉक्स ऑफिसवरनं तो गेलाही. उथळ कथा आणि पांचट संवादाचा भरणा असलेल्या या चित्रपटाकडून सलमानच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र त्या काही पूर्ण झाल्या नाही. अंतिमबाबत तसं म्हणता येईल. येत्या काही दिवसांत हा चित्रपट कितपत प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून घेईल त्यावर त्याचं यश अवलंबून आहे.

मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नला हिंदी – मराठी चित्रपट रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यातील कथा, संवाद सारं लक्षवेधी होतं. अंतिमच्या पहिल्या फ्रेमपासून मुळशी पॅटर्नचा प्रभाव डोक्यातून काही केल्या जात नाही. नाही म्हटलं तरी आपण त्या चित्रपटातील कलाकार आणि या चित्रपटातील कलाकार, त्यांचा अभिनय याची तुलना करायला लागतो. ओम भूतकरनं मुळशी पॅटर्नमध्ये राहुल्या साकारताना कमाल केली होती. त्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतूकही केलं होतं. यात आयुष शर्मानं ती भूमिका केली आहे. पुण्यात तो काही सीनसाठी 33 किमी धावला होता. अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या चित्रपटामध्ये त्यानं ठीकठाक भूमिका साकारलीय. विशेष म्हणजे सलमानपुढे तो तितक्याच आत्मविश्वासानं दिसतोय हेही नसे थोडके.

शहरीकरणाचं वारं लागलेल्या गावांमध्ये बिल्डर अर्थकारण करु लागतात तेव्हा फोफावणाऱ्या गुन्हेगारीचा खात्मा करण्यासाठी पोलिसांना पुढाकार घ्यावा लागतो. भाईगिरीच्या जोरावर वाट्टेल ते करु अशी मानसिकता दरम्यानच्या काळात वाढत असताना त्याचा परिणाम भवतालच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रावरही कसा पडतो हे आपल्याला गुन्हेगारी पटातून पाहायला मिळते. अंतिम – द फायनल ट्रुथ हेच सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो केविलवाणा आहे हे आपल्याला चित्रपट पाहताना कळते.

सलमानच्या तोंडी काही मराठी संवाद आहेत. त्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटामध्ये त्यानं बरेच मराठी संवाद म्हटले आहे. पण शेवटी त्याचं मराठी बोलणं तितकं आपल्यापर्यत पोहचत नाही. सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये यांच्या भूमिका प्रभावी आहेत. त्यामुळे काही काळ का होईना चित्रपटाची लाईन स्थिर राहण्यास मदत होते. महिमा मकवाना हिनं या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिचा अभिनयही बरा आहे. यासगळ्यात आयुष शर्मा त्याच्या हटकेपणासाठी लक्षात राहतो. सलमानपुढे तो उजवा ठरलाय. मुळशी पॅटर्नचे फॅन असणाऱ्यांनी या चित्रपटाच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करु नये. केलाच तर निराशही होऊ नये. असं सांगावं लागेल. सलमानच्या चाहत्यांसाठी तर ही वेगळी ट्रीट म्हणावी लागेल. त्यात नेहमीप्रमाणे तो त्याच्या गंमतीशीर नाचतो, बॉडी दाखवत फायटिंगही करतो. आणि सगळ्यांना पराभूत करुन विजयी भव…असंही सांगतो.

सलमानच्या नव्या अवतारासाठी, मांजरेकरांच्या हटके कलाकृतीसाठी, आयुष शर्माच्या लक्षवेधी भूमिकेसाठी, सलमानच्या तोंडून मराठी संवाद ऐकण्यासाठी, आणि सगळ्यात शेवटी सलमान – आयुषची अंतिम फाईट पाहण्यासाठी चाहत्यांनी हा सिनेमा जरुर पाहावा…

रेटिंग – **

दिग्दर्शक – महेश मांजरेकरEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here