
5 तासांपूर्वी
पुणे (नारायणगाव) : हिवरे तर्फे नारायणगाव येथील महिलेच्या अपघाती मृत्यू नंतर संतप्त झालेल्या खोडद व हिवरे तर्फे नारायणगाव परिसरातील ग्रामस्थांनी आज सायंकाळी येथील पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. या वेळी ग्रामस्थांनी आजी, माजी खासदार यांचा निषेध केला. मृत महिलेचा अंत्यविधी बायपास रस्त्यावर करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने येथील वातावरण तप्त झाले आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या बाबत माहिती अशी : येथील नारायणगाव -खोडद रस्ता पुणे नाशिक महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याला काटकोनात जोडतो. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने चौक केला असून गतिरोधक बसवले आहेत.गतिरोधक योग्य पध्दतीने न बसवल्याने या रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने जा ये करत आहे.या मुळे हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद परिसरातील शेतकरी, विद्यार्थ्या, ग्रामस्थांना या चौकातून नारायणगावकडे जाताना जीव मुठीत धरून जा ये करावी लागत आहे.अपघाताचा धोका विचारात घेऊन या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करावा आशी मागणी येथील ग्रामस्थ व दोन्ही गावच्या सरपंच, शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम सुरू झाल्या पासून केली होती. मात्र या मागणीकडे आजी व माजी दोन्ही खासदारांनी दुर्लक्ष केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा:
परमबीर सिंह यांच्यावरील कारवाईबाबत गृहमंत्री म्हणाले की…
बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूकीस ग्रामस्थांनी विरोध केला होता.वेळोवेळी आंदोलने केली होती. मात्र खोडद रस्ता चौकातील भुयारी मार्गाचे काम तिसऱ्या टप्प्यात घेण्यात आल्याचे आश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ग्रामस्थांना दिले होते. मागील चार महिन्यात बाह्यवळण रस्त्यावर पाच ते सहा अपघात झाले आहेत.खोडद चौकात मंगळवारी (ता.२३) झालेल्या अपघातात कल्पना योगेश भोर (वय ३२) व संगीता कोरडे या गंभीर जखमी झाल्या होत्या. या पैकी पुणे येथे उपचार सुरू असलेल्या कल्पना भोर या शेतकरी महिलेचा आज सायंकाळी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच दोन्ही गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले.
ग्रामस्थांनी बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक बंद केली.या मुळे वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ कल्पना भोर यांचा अंत्यविधी बाह्यवळण रस्त्यावर करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण तप्त झाले आहे.नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Esakal